चौल परिसरात विपुल उत्पादन
| रेवदंडा | प्रतिनिधी |
वाढत्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी ताडगोळ्यांना मागणी वाढत आहेत. सध्या चौलमधील ‘ताडगोळे’ पर्यटकांची खास पसंती असून, मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडाची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पत्र स्थानिक साधतात.
ऐन उन्हाळ्याचे दिवसात ताडगोळे थंडावा म्हणून पसंतीचे असते. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक तसेच स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसते. चौलमध्ये नारळ पोफळीच्या बागेसह ताडाची झाडे सुध्दा विपुल असून, त्याला येणाऱ्या नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार व चवदार असून उंच उंच ताडाच्या झाडावर चढून काढण्याचा व फळांतील गर काढण्यास कस लागतो.
उन्हाळ्यात येत असलेल्या ताडगोळ्यांना बाजारात चांगली मागणी असते. उन्हाळ्याचे दिवसात अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरिरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणाऱ्या ताडगोळ्यांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ ठराविक ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात उपलब्ध असणारे फळ आहे. यांची चव काहीशी शाहळ्यांतील मलईसारखी लागत असून चवीला हे फळ फारच मधूर असते. इंग्रजी भाषेत ‘आईस ॲपल’ म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते. या फळाच्या सेवनाने शरिराला आवश्यक असलेले क्षार व इतर पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात. ज्यांना त्वचेवर उन्हाळ्यात सतत पुरळ येत असेल, तसेच ज्यांना या दिवसात चेहऱ्यावर मुरूमे येत असतील त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळामध्ये कर्करोगारी प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते. आरोग्यासाठी या फळाचे फायदे मिळविण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या फळाचे भरपूर सेवन करावे, वाढत्या उकाड्यात सध्या सारेच हैराण झालेले असतात. घश्याला पडणाऱ्या कोरडवर उपाय म्हणून बाजारातील शितपेय किंवा बर्फाचे गोळ्यांवर ताव मारतात, परंतु कृत्रिक थंडाव्यापेक्षा ताडगोळ्यासारखा नैसर्गिक उपाय केव्हाही आरोग्यासाठी चांगलाच परिणामकारक ठरतो. ज्याना वजन घटवायचे असेल त्याच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे तसेच फळातील रसामुळे भुक शमविण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. ज्याना लिव्हरच्या संबंधीत काही विकार असतील त्याचेसाठी ताडगोळ्यांचे सेवन उपयुक्त आहे. या फळामध्ये पोटॅशियम मुबक मात्रेमध्ये असून लिव्हरमध्ये साठलेले घातक, विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या फळाच्या सेवनाने शरिराला श्रम करण्याची आवश्यक ताकद व उर्जा मिळते. या फळाच्या सेवनाने शरिरातील ग्लुकोजची पातळी वाढत असल्याने दिवसभरासाठी लागण-ताकद या फळाच्या सेवनातून मिळत असते. अशा या गुणकारी ताडगोळे फळांची फार मोठी मागणी उन्हाळ्यात पर्यटक व स्थानिक वर्ग करत असतो. चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे.
आरोग्यास लाभदायी
कृत्रिक थंडाव्यापेक्षा ताडगोळयांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही आरोग्यासाठी चांगलाच परिणामकारक ठरतो. ज्यांना वजन घटवायचे असेल त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे तसेच फळातील रसामुळे भूक शमविण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. ज्यांना लिव्हरच्या संबंधित काही विकार असतील त्यांचेसाठी ताडगोळयांचे सेवन उपयुक्त आहे.







