| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. परहूर येथे कार्लेखिंडीजवळ चोरांनी घरफोडी करून घरातील ऐवज व रोख रक्कम चोरुन नेली. परहूर येथील कार्लेखिंड येथे प्रयास हॉस्पीटल शेजारी असलेल्या मोरेश्वर पाटील यांच्या घरी ही चोरी झाली. मोरेश्वर पाटील यांचे पंधरा दिवसांपूर्वी पनवेल येथे निधन झाले. त्यामुळे सर्व कुटुंब पनवेल येथे राहत होते. याचा फायदा घेऊन चोरांनी रात्री घराच्या दोन्ही दरवाजांचे कूलूप तोडले.
घरात शिरून घरातील सर्व वस्तू शोधत एक चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या व 65 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तसेच देव्हाऱ्यातील देवांची मूर्ती व तांब्याची भांडी सुध्दा चोरुन नेली. सदरील घटनेची माहिती मिळताच पाटील कुटुंब पनवेल येथून आले. तसेच अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चोकशी करुन पुढील तपास करीत आहेत. परिणामी, एका महिन्यात परहूर विभागात दोन चोऱ्या झाल्याने सर्व नागरिक भयभीत झाले आहेत.