रुपाली केळस्कर
23 वर्षांपूर्वी देशात पातळ पॉलिथिन पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर प्रयत्न केले गेले. परंतु प्लॅस्टिक उद्योगातल्या प्रचंड रोजगारक्षमतेचं भांडवल करण्यात आल्याने त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण किती वाढतं आणि मानवी जीवन तसंच प्राणीमात्रांच्या मृत्यूला प्लॅस्टिक किती आणि कसं कारणीभूत आहे, याचा विचार कधीच करण्यात आला नाही…
देशात पातळ पॉलिथिन पिशव्यांवर बंदीचं पहिलं पाऊल 1999 मध्ये उचलण्यात आलं. त्यानंतरच्या वर्षांमध्ये या दृष्टीने केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले. मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. आता पुन्हा एकदा ङ्गसिंगल यूज प्लॅस्टिकफवर (एसयूपी) देशव्यापी बंदी लागू करण्यात आली आहे. एक जुलैपासून ही बंदी लागू झाली. त्याला पर्याय शोधण्यासाठी सरकारनं वर्षभराचा वेळ दिला होता. परंतु तो सत्कारणी न लावता आता या उद्योगानं पुन्हा ओरड करायला सुरुवात केली आहे. मागच्या वेळी सरकारनेही प्लॅस्टिक बंदीची परिणामकारकता किती आहे, हे पाहिलं नाही. प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणल्याने कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू झाली. बाहेर पडताना लोक कापडी पिशवी घ्यायला लागले. पण नंतर सरकारने आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली. त्यातही एका राज्यात प्लॅस्टिक बंदी आणि दुसरीकडे मोकळं रान अशी स्थिती बघायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आत्ताची प्लॅस्टिक बंदी मागील बंदीसारखी कुचकामी नसल्याचं सरकारला कृतीतून सिद्ध करावं लागेल. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासोबतच लोकांनी एकेरी वापराच्या प्लॅस्टिकच्या सवयीतून बाहेर पडण्याची गरज आहे.
एखादं उत्पादन शक्य तितक्या वेळा वापरणं हे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक प्रभावी पाऊल आहे. एकेरी वापराच्या प्लॅस्टिकऐवजी एकेरी वापराच्या पर्यायांचा प्रचार केल्याने समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळू शकत नाही. प्लॅस्टिकबंदीच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण म्हणजे पर्यायांचा अभाव. लोकांना असा एखादा सोपा आणि स्वस्त पर्याय मिळायला हवा. पण ते झालं नाही. एकूण प्लॅस्टिकपैकी सुमारे एक तृतीयांश ङ्गसिंगल यूज प्लॅस्टिकफ (एसयूपी) आहे. एसयूपीचा दर वर्षीचा वापर सुमारे 70 लाख टन इतका आहे. ङ्गएसयूपीफच्या उत्पादनात अनेक उद्योग आणि हजारो कामगार गुंतले आहेत. त्यामुळेच त्यांचा व्यवसाय बेकायदेशीर ठरवताना पर्यायी उपजीविकेचाही विचार करणं आवश्यक आहे. उपजीविकेच्या पर्यायाचा अभाव असल्यामुळे बाजारपेठ बंदीची तयारी करू शकत नाही. खरं तर हेच प्रयत्न अयशस्वी होण्याचं कारण बनतं. ङ्गएसयूपीफ आणि त्यांचे पर्याय प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेताना जीवनचक्र विश्लेषण (एलसीए-लाईफसायकल अॅनॅलिसीस) महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरणावर पॉलिथिन पिशव्यांचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी कागदी शॉपिंग बॅग चार ते आठ वेळा वापराव्या लागतील. तसंच लाखो ङ्गएसयूपीफ कपना पर्याय असू शकत नाही. मातीच्या कपचा पर्याय निवडला तरी त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे मातीचा वरचा थर खराब होईल. ङ्गबायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकफचा वापरही सूक्ष्म प्लॅस्टिकची समस्या सोडवू शकत नाही.
असं असलं तरी दुसरीकडे यासंबंधी कडक कायदे करून आणि नागरिकांना जागरूक करून जगातले अनेक देश प्लॅस्टिकच्या कचर्यापासून मुक्त होत आहेत. फ्रान्सने 2016 मध्ये प्लॅस्टिकबंदीचा कायदा केला. 2020 पर्यंत प्लॅस्टिक प्लेट्स, कप आणि सर्व प्रकारची भांडी यावर टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंदी घालण्यात आली. प्लॅस्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन गरजेच्या सर्व उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. आता तिथे प्लॅस्टिकला पर्याय म्हणून सेंद्रिय पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जात आहे. आयर्लंडने 2002 मध्ये प्लॅस्टिक पिशवी कर लागू केला. त्या अंतर्गत लोकांना प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यासाठी जास्त कर भरावा लागला. त्यामुळे काही दिवसांनी तिथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर 94 टक्क्यांनी कमी झाला. इतर विकसनशील देशांप्रमाणेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे रवांडात ड्रेनेजचा मार्ग रोखला गेला होता. याच कारणामुळे तिथल्या परिसंस्थेचं प्रचंड नुकसानही झालं. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिथल्या सरकारने नैसर्गिकरित्या खराब न होणार्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली. हा आफ्रिकन देश 2008 पासून प्लॅस्टिकमुक्त आहे. स्वीडनमध्ये प्लॅस्टिकवर बंदी नाही. तिथे प्लॅस्टिकचा अधिकाधिक पुनर्वापर केला जातो. तिथे सर्व प्रकारच्या कचर्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी शेजारील देशांकडून कचरा विकत घेतला जातो.
धातूशास्त्रज्ञ अलेक्झांडर पार्केस यांनी प्रथम प्लॅस्टिक तयार केलं. 1862 मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा ङ्गपॅरोक्सेटीनफ नावाचं प्लॅस्टिक बनवण्यात आलं. जगात पहिल्यांदा प्लॅस्टिक दिसलं तेव्हा त्याच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिलं गेलं. एके काळी पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून रहावं लागत होतं. तशा अनेक उत्पादनांची जागा प्लॅस्टिकने घेतली पण शतकापेक्षा कमी कालावधीतच लोकांना त्याचा धोका समजू लागला. आज विसाव्या शतकातली ही क्रांती एकविसाव्या शतकापुढील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. डोंगरापासून समुद्रापर्यंत आणि शेतीपासून आपल्या पोटापर्यंत सगळीकडे प्लॅस्टिक पोहोचलं आहे. आत्तापर्यंत 16 देशांनी त्यावर बंदी घातली असून शंभरहून अधिक देश याविरोधात कडक कायदे करत आहेत. आता आपला देशही त्यांच्या पंक्तीमध्ये बसला आहे.
अर्थातच प्लॅस्टिकवर बंदी आल्यानंतर पर्याय म्हणून काय अंगीकारायचं आणि या बिकट प्रश्नातून सुटका कशी करुन घ्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकच्या विरोधात मोहिमा राबवल्या गेल्या असल्या तरी आपण आवश्यक तेवढ्या प्रमाणात सुधारणा करण्यास तयार नाही, हे सत्य आहे. म्हणूनच प्लॅस्टिकला पर्याय शोधायचा असेल तर इतिहासात थोडं मागे जावं लागेल. बाजारातून कोणती उत्पादनं काढून प्लॅस्टिकने स्थान निर्माण केलं याचा विचार करावा लागेल. त्यातूनच प्लॅस्टिक हटवण्याचा मार्ग निघेल. प्रत्येक उत्पादनासाठी पर्याय शोधले जाऊ शकतात. कटलरी उत्पादनं असोवा इतर जीवनावश्यक वस्तू, सर्व स्थानिक पातळीवरच मिळू शकतात. गरज आहे मागे वळून पाहण्याची… प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण शरीरात पोहोचतात आणि अनेक असाध्य रोगांना जन्म देतात. त्यामुळेच प्लॅस्टिकपासून लवकरात लवकर सुटका करुन घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्लॅस्टिक वापराचा अन्नाशी थेट संबंध आहे. त्यामुळेच सर्वप्रथम आपण बाजारातून नानाविध वस्तू पॉलिथिनच्या पिशवीत आणण्याची सवय सोडली पाहिजे. याऐवजी ज्यूटच्या पिशव्या हा सोपा पर्याय असू शकतो. प्लॅस्टिकच्या काड्या वापरल्या जातात, तिथं लाकडी काड्यांचा अवलंब करता येतो. सध्याच्या युगात ङ्गबायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकफचा पर्यायही आपल्यासमोर आहे. खराब होत चाललेली हवा, वाढतं प्रदूषण, पाण्याचा खालावणारा दर्जा आणि मातीचा कस टिकवण्याचं आव्हान हे केवळ हिरव्या उत्पादनांनीच पेलता येऊ शकतं. प्लॅस्टिकचा अमर्याद वापर ही आपत्ती असेल तर या आपत्तीत आपल्याला संधी शोधावी लागेल. त्यामुळेच निसर्ग प्लॅस्टिकमुक्त करणं शक्य होईल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होऊ शकतात.
मानवी जीवन सुसह्य करणारं प्लॅस्टिक अल्पावधीत मानवतेसाठी मोठ्या चिंतेचं कारण बनलं. शेकडो वर्षे विघटीत होऊ न शकणारं हे रासायनिक संयुग आज रक्तबीज बनलं आहे. सूक्ष्म प्लॅस्टिकच्या रूपात असंख्य भाग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. या भस्मासुराचं सूक्ष्म रूप अंटार्क्टिका या निर्जन खंडापर्यंत पोहोचलं आहे. या रक्तबीजानं आता आमच्या घराच्या पाणीपुरवठ्यातही शिरकाव केला आहे. प्रकरण इथेच संपत नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे की हे विषबीज रक्तासोबत मानवी नसांमध्येदेखील फिरू लागलं आहे. प्लॅस्टिकवरील आपलं वाढतं अवलंबित्व आज असं विदारक चित्र निर्माण करत आहे. म्हणूनच सर्वजण आपलं दैनंदिन जीवन प्लॅस्टिकवरील अति अवलंबितेपासून मुक्त करत नाहीत तोपर्यंत कोणताच उपाय प्रभावी ठरणार नाही. म्हणूनच आता प्रत्येक पाऊल पूर्ण ताकदीने आणि निर्धाराने उचललं जायला हवं. प्लॅस्टिकयुक्त शिसं, कॅडमियम आणि पारा यांचा थेट मानवाशी संपर्क येतो तेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होतेच, खेरीज कर्करोगाचा धोकाही वाढतो. मानवच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीसाठी पॉलिथिनचा वापर घातक आहे. त्यामुळेच त्यावर बंदी घालणं सर्वांच्या हिताचं आहे. या पार्श्वभूमीवर इंदूर महापालिकेकडून बचत गटांच्या माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातला तरुणवर्गही या दिशेने पुढाकार घेत आहे.
प्लॅस्टिकवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरात अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक लाखाहून अधिक कागदी पिशव्या तयार करून फळं, भाजी मंडई आणि अन्य वस्तूंच्या बाजारात वितरित करण्यात आल्या. त्यामुळे सर्वच विक्रेते कापडी पिशव्यांचा वापर वाढवतील, अशी आशा आहे. त्याच वेळी शहरातली बहुतांश हॉटेल्स आणि काही रेस्टॉरंटमध्येही प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या जागी उसाच्या चोथ्यापासून आणि कॉर्न स्टार्चपासून बनवलेल्या कप, ताटल्या आणि ग्लासेसचा वापर सुरू झाला आहे. असे स्तुत्य प्रयोग देशाच्या प्रत्येक भागात केले गेले तर परिस्थिती बदलण्यास फार वेळ लागणार नाही.






