टोरंट प्रकल्पाविरोधात उल्का महाजन मैदानात; सायडोंगर ग्रामसभेत सरकारला सुनावले
| नेरळ | प्रतिनिधी |
जंगल म्हणजे केवळ झाडांचे अस्तित्व नाही, तर आदिवासींचे जगणे, संस्कृती आणि हक्कांची ओळख आहे. विकासाच्या नावाखाली जंगल उद्ध्वस्त करून कोणाचा विकास साधणार? असा सवाल करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात सरकारला थेट इशारा दिला. रोजगाराच्या आश्वासनांमागे स्थानिकांची जमीन आणि जंगल हिरावून घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. जंगल वाचवण्यासाठी आता संघर्ष अधिक तीव्र होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सह्याद्री बचाव संघर्ष समितीच्या वतीने रविवार, दि. 22 रोजी पाली सायडोंगर येथे आदिवासी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, नॅन्सी गायकवाड आणि जागृत कष्टकरी संघटनेचे सचिव अनिल वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. जंगल हक्क कायद्याने आदिवासींना दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे महत्त्वाचे असताना टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी स्थानिकांवर सक्ती का केली जात आहे, असा सवाल उल्का महाजन यांनी उपस्थित केला.
सरकार एका बाजूला जंगल वाचवण्याच्या घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली त्याच जंगलावर घाव घालण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप महाजन यांनी केला. केवळ झाडे लावून जंगल निर्माण होत नाही. जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या हक्कांचा आदर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
रोजगार मिळेल, विकास होईल, अशा आश्वासनांमागे नेमके काय दडले आहे? आता स्थानिक जनता रोजगाराच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आदिवासींचे जंगल आणि जमिनीवरील अधिकार डावलून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न का केला जात आहे? जंगल, जमीन आणि जगण्याचा अधिकार धोक्यात घालून कोणाचा विकास साधला जाणार? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
टोरंट कंपनी आणि सरकारकडून रोजगाराची आश्वासने देऊन जनतेला भुलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत जंगल वाचवण्याचा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या ग्रामसभेला पाली संघर्ष समितीचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
