उघड्या डीपीकडे महावितरणचे दुर्लक्ष

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी (गणपतवाडी) येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रच्या डीपीला अनेक महिन्यांपासून ना कडी, ना कुलूप अशी अवस्था असल्यामुळे या उघड्या डीपीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरण विभागाचे मात्र या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गणपतवाडी या संपूर्ण गावाला ज्या डीपीवरुन वीजपुरवठा होतो, ती डीपी गावाच्या एकदम सुरुवातीलाच आहे. या ठिकाणी महावितरणाच्या वतीने बसविण्यात आलेल्या डीपीला झाकण नसल्यामुळे त्यातील विजेचा फ्युजन व तारा उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण ह़ोण्याची शक्यता आहे. विजेच्या डीपीमधील उघड्या तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता असताना महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे नागरीकांचा जीव टांगणीला लागला आहे. या उघड्या असलेल्या डीपीच्या आजूबाजूला लहान मुले खेळण्याकरिता जात असल्यामुळे त्यांचा चुकून स्पर्श झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी उघडी डीपी म्हणजे नागरीकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. एखादी जीवितहानी झाली तरच संबंधित विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न नागरीकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. या विभागाने वीज रोहित्राच्या डीपी झाकण्यासाठी किंवा डीपी संरक्षणाच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना केली पाहिजे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

या उघड्या डीपीमुळे मनुष्यहानी होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असून, याकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक पाहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा गणपतवाडी ग्रामस्थ विनोद निरगुडे यांनी दिली आहे.

Exit mobile version