महसूल प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत. उन्हात उभे राहून बंदोबस्त करीत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीत पोलीसच दुर्लक्षित असल्याचा आरोप पोलीस कर्मचार्यांनी केला आहे. उन्हात उभे राहून काम करीत असतानादेखील त्यांना पाणी व इतर सुविधा देण्यास अलिबागमधील महसूल यंत्रणा अपयशी ठरत असल्याची खंत पोलीस कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. याकडे जिल्हाधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेण, पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यास उमेदवार येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणारे उमेदवार, त्यांच्यासोबत असणारी मंडळी अशा एकूण पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर गडबड होऊ नये यासाठी पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.
निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करून पहारा देत आहेत. अलिबागमधील उपविभागीय कार्यालयात सकाळी अकरा ते तीन यावेळेत विनाकारण कोणालाही पोलीस फिरकू देत नाहीत. भरउन्हात ते आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, त्यांच्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून त्यांना पाणी व सुविधा उपलब्ध करावी लागत आहे.
निवडणुकीसाठी काम करणार्या महसूल कर्मचार्यांना पाणी व इतर सुविधा दिली जाते. परंतु, पोलिसांना साधे पाणीदेखील विचारले जात नाही, असे बोलले जात आहे. असाच प्रकार मागील लोकसभा निवडणुकीतदेखील झाला होता. मात्र, तेथील पोलिसांनी याबाबत आवाज उठविल्यावर तात्काळ त्यांना पाणी व इतर सुविधा देण्याची कार्यवाही झाल्याची माहिती समोर येत आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे व आचारसंहितेची अंमलबजावणी चोखपणे बजावणारे पोलीस ऐन निवडणुकीत दुर्लक्षित असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. याकडे निवडणूक अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सेवासुविधांचा अभाव
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महसूल विभागाबरोबरच पोलीस कर्मचारीदेखील काम करीत आहेत. निवडणुकीत काम करणार्या महसूल कर्मचार्यांना सोयी सुविधा दिल्या जातात. परंतु, पोलीस कर्मचार्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भरउन्हात बंदोबस्तासाठी असतानादेखील त्यांना साधे पाणीदेखील विचारत नाही, ही शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया एका पोलीस कर्मचार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.