ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांचा विकास कागदावरच
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
चरी येथील शेतकर्यांचा संप एक ऐतिहासिक लढा म्हणून संबोधला जातो. महामानवाने भेट दिलेल्या या स्थळाच्या विकासासाठी गेल्या सात वर्षांत निधीच आला नाही. ग्रंथालय, वाचनालय व सभागृहाचे काम अद्यापही कागदावर आहे. त्यामुळे हे ठिकाण दुर्लक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, व आर्थिक क्षेत्रातील योगदान व आधुनिक भारत घडविण्यामध्ये मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या संघर्षाची समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला महामानवाच्या 125 व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, स्थळांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास करून तो परिसर पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्थळांच्या विकासासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, विविध स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव घेऊन निधी वितरीत करण्याचे परिपत्रक 24 मार्च 2017 मध्ये काढण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील चरी या ठिकाणी 91 वर्षांपूर्वी शेतकर्यांनी सावकाराविरोधात संप पुकारला होता. शेतकर्याचे नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा करण्यात आला होता. प्रदीर्घ काळ हा संप चालला होता. या संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देत अनेक वेळा चरीला भेट दिली होती. या सामाजिक चळवळीतून कसेल त्याची जमीन हा कायदा पारित झाला. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकर्यांना मुक्त करण्यास यश आले. महामानवाने भेटी दिलेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने चरी येथील विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ग्रंथालय, वाचनालय आणि सभागृह बांधण्याचे नियोजनही झाले होते. या कामाचे भूमीपूजनदेखील तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते झाले होते. परंतु, गेल्या सात वर्षांत या स्थळांच्या विकासासाठी निधीच उपलब्ध झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.