। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये सिडको, गुरचरण, पीडब्ल्यूडी, महसूल, मेरिटाईम बोर्ड, जेएनपीए, वक्फ बोर्ड यांसारख्या शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय फोफावत आहेत. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बार, रेस्टॉरंट, बियर शॉपी, ढाबे, कंटेनर यार्ड, भंगार माफिया, सर्व्हिस सेंटर आणि पार्किंग व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने या व्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे भ्रष्टाचाराला खतपाणीऔद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही अनेक जमिनी मोकळ्या पडून आहेत. या जमिनींवर बेकायदेशीर व्यवसायांचा धंदा तेजीत सुरू आहे. कायदेशीर परवानगीशिवाय दारूची दुकाने, कंटेनर यार्ड आणि बियर शॉपी कशा सुरू आहेत, हा मोठा प्रश्न आहे.
संबंधित शासकीय अधिकार्यांना तक्रारी दिल्या जात असल्या तरी त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. उलट, आम्हाला फक्त तीन वर्षे नोकरी करून पुढे जायचे आहे किंवा बदलीसाठी लाखोंचा खर्च झालाय, तो वसूल करायचा आहे, अशा कारणांची चर्चा आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग कारवाईला टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे.