दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यात रेड्यांच्या झोंब्यांचे शौकीन मोठ्या प्रमाणात असून, रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून केले जात आहेत. या झोंब्यांदरम्यान प्रतिस्पर्धी रेड्यांच्या पराभवासाठी मांत्रिक तांत्रिकांमार्फत अंधश्रद्धा पसरविण्याचेही बेकायदेशीर उपक्रम राबविले जातात. मात्र, पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे रेड्यांच्या झोंब्यांचे बेकायदेशीररित्या आयोजन केल्याने पोलादपूर पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभी महाडकडून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यात सुरू झाले. विविध राजकीय व्यक्तींकडूनही रेड्यांच्या झोंब्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य व देणग्या दिल्या गेल्या. गेल्या महिन्यामध्ये पोलादपूरमध्ये दोन ठिकाणी रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन यशस्वी झाल्यानंतर हजारो झोंबी शौकिनांची उपस्थिती दिसून आली. अशाच प्रकारच्या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे गुरूवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी करण्यात आल्याचे पोलादपूर पोलीस ठाण्याला समजून आले. यावेळी या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन भोगाव खुर्द येथील संदीप शांताराम शेलार आणि अक्षय काशिराम कदम यांनी जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा केल्याने पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांनी फिर्याद दिली. ठाणे अंमलदार पोलीस नाईक महाडीक यांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक उदय धुमास्कर हे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील रेड्यांच्या झोंब्यांच्या आयोजनाचे खासगी वृत्तवाहिन्यांकडून वृत्तांकन इंटरनेटवर प्रसारित होत असून, काही कालावधीनंतर त्या प्रसारणाची लिंक नष्ट केली जात आहे. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी रेड्यांच्या पराभवासाठी अनेक मांत्रिक तांत्रिक यांच्याकडून अघोरी प्रकार झोंब्यांच्या आयोजनाच्या शेतावर तसेच माळावर केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.