राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडमार्फत विशेष पथकांची नेमणूक
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहे. 31 डिसेंबर 2024 तथा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कामाला लागले आहे. अवैध दारु, वाहतूक, निर्मिती व विक्री करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे.त्यासाठी सात विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये भरारी पथकांचा समावेश आहे. थर्टी फर्स्टच्यानिमित्ताने दारु विक्री, वाहतूकीचा होणारा काळा बाजार या पथकाद्वारे रोखला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, रायगड विभागाकडून देण्यात आली.
रायगड जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा ठरत आहे. नव्या 2025 या वर्षाचे स्वागत करण्याबरोबरच 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्हयामध्ये तयारी सुरु केली आहे. जिल्हयातील अलिबागसह अनेक पर्यटन स्थळांमधील हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरन्ट, फार्महाऊस फुल्ल झाले आहे. काहीजण आपल्या कुटुंबियांसमवेत तर काहीजण आपल्या मित्र मंडळींसमवेत थर्टी फर्स्ट साजरा करणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांनी रायगड जिल्हयाला पसंती दर्शविली आहे. काही हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत. दरम्यान काही ठिकाणी दारु पिणारेदेखील असणार आहेत.
जिल्ह्यात या कालावधीत बनावट दारूची विक्री करून त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असल्याच्या घटना घडत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे रात्री बेरात्री महामार्गावरून धावणार्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. बेकायदेशीरित्या गावठी दारुची विक्री, वाहतूक करणारे तसेच दुकानांमध्ये अनधिकृतपणे साठा ठेवून विक्री करणार्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. रात्रीची गस्त घालून कारवाई केली जाणार आहे. जिल्हयामध्ये दोन हजारहून अधिक हॉटेल, रेस्टॉरन्ट आहेत. या ठिकाणीदेखील तपासणी या पथकाद्वारे केली जाणार आहे.
संशयित वाहनांची होणार तपासणी
रेल्वेने वेगवेगळ्या राज्यातून येणार्यांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली आहे. त्यात काही जण परराज्यातील मद्य आणून जिल्ह्यात विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणार्या मद्यावर अंकूश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क रायगड विभाग, रेल्वे विभागाची मदत घेणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रेल्व स्थानकांमध्ये संशयित व्यक्तीच्या सामानाची आणि संशयित वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
सोशल मिडीयाद्वारे नागरिकांची घेणार मदत
अवैध मद्य विक्री, निर्मितीवर अंकूश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे. सोशल मिडीयाद्वारे नागरिकांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे. अवैध मद्य विक्री, निर्मितीबाबत 8422001133 या क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला असून नागरिकांच्या मदतीने संपर्क साधून अवैध दारु विक्री, निर्मितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
बनावट मद्य विक्री, निर्मितीवर ठेवणार लक्ष
मागील वर्षी पनवेलमध्ये परराज्यातील बनावट मद्य तयार करणार्या गोडावूनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडने कडक पावले उचलली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडावूनची माहिती घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. परराज्यातील बनावट मद्य विक्री, निर्मिती करणार्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
विनापरवाना पार्ट्यांवर होणार कारवाई
नवीन वर्षाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात पार्टींचे आयोजन केले जाणार आहे. या निमित्ताने मद्य विक्री परवाना देण्याची व्यवस्था राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आली आहे. मद्य विक्रीसाठी एक दिवसाचा परवाना उपलब्ध केला आहे. ऑनलाईन अर्जाची सोय केली आहे. पडताळणी करूनच मद्य विक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. विना परवाना दारुच्या पार्टीचे आयोजन करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडने दिली आहे.