वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; देशी, विदेशी दारुसह दहा लाखांचा ऐवज जप्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा आढळून आला. विक्रीसाठी ठेवण्यापासून वाहतूक करणाऱ्या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 लाख 29 हजार 173 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात सव्वा पाच लाख रुपयांच्या दारुच्या साठ्याचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई केली असून, या कारवाईने अवैध दारु विक्री, वाहतुकीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे बेकायदेशीररित्या देशी, विदेशी दारु विक्री व वाहतूक होत असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक मिलींद चापडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी (दि.18) दुपारी छापा टाकला. या छाप्यात वायशेतमधील एका घराच्या मागील बाजूस 11 हजार 455 रुपयांचा दारुसाठा आढळून आला. त्यामध्ये मॅकडॉनोल्ट, इंपिरिअल ब्लू, डीएसपी ब्लॅक या विदेशी दारुसह जीएम कंपनीच्या देशी दारुच्या बाटल्यांचा समावेश आहे. तसेच एम.एच. 06 सी.पी. 4392 या क्रमांकाच्या पिकअप गाडीमध्ये पाच लाख 17 हजार 718 रुपयांचा ऐवज आढळून आला. एकूण पाच लाख 29 हजार 173 रुपयांचा दारुचा साठा तसेच पाच लाख रुपयांची गाडी असा एकूण दहा लाख 29 हजार 173 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये वायशेतमधील सुशील पाटील आणि महावीर चौकमधील राहुल राजपूत यांचा समावेश असून, त्यांच्या विरोधात अलिलाबग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version