महिला शेतकरी मिराबाई ठाकूर यांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दिव येथील वयोवृद्ध महिला शेतकरी यांच्या मालकीच्या मिळकतीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बेकायदेशीररित्या टॉवर बांधला आहे, असा आरोप मिराबाई ठाकूर या शेतकरी महिलेने केला आहे. या टॉवरमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, जीवितास धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे टॉवर काढण्यात यावे, अशी मागणी ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मिराबाई यांच्या तक्रारीनुसार, दिव येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक 75/1, 75/2, 75/9, 261 व 575 यांच्या सामाईक मालकीची व ताबेकब्जा वहिवाटीची मिळकत आहे. त्यामध्ये त्यांचे राहते घर आहे. या मिळकतीपैकी 75/1 या जागेत महावितरणने बेकायदेशीररित्या उच्च दाब विद्युत वाहिनीचे टॉवर उभारले आहे. कोणतीही परवानगी न घेता, मनमानी कारभार करीत महावितरणने हा प्रकार केल्याचा आरोप मिराबाई ठाकूर यांनी केला आहे. या टॉवरमुळे त्यांच्या मिळकतीचे बरेसचे क्षेत्र उच्चदाब विद्यूत वाहिनीखाली आले आहे. त्यामुळे या जागेत फळपिकांसह इतर पिकांची लागवड करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे ठाकूर यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या टॉवरमधून रात्रीच्यावेळी विद्यूत वाहिनीचा त्रासदायक आवाज येतो. त्यामुळे कुटूंबाच्या जिवीतास व आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या टॉवरच्या मार्फत वेगवेगळ्या कंपन्यांना विद्यूत पुरवठा करून महावितरण कंपनी व्यापार करीत आहे. ठाकूर यांच्या जागेत हे टॉवर असतानादेखील कंपनीने त्याचा कोणताही मोबदला दिला नाही. विनामोबदला या जागेचा वापर करीत आहेत. टॉवरच्या दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून जागेची नासधूस करीत आहेत. मालकीच्या जागेत असलेले टॉवर पंधरा दिवसात काढण्यात यावे, अन्यथा पेणमधील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण केले जाईल असा इशारा महिला ज्येष्ठ शेतकरी मिराबाई ठाकूर यांनी दिला आहे.
दिवमधील शेतकरी यांच्या जागेत पारेषण किंवा महावितरण कंपनीने टॉवर उभारले आहे. याची माहिती घेतली जाईल. शेतजमीन असो, अथवा ओसाड जमीन असो, त्याठिकाणी टॉवर उभारण्याची तरतूद आहे. मोबदला दिला जात नाही. ती लाईन चालू असल्यास टॉवर काढणे शक्य नाही. अन्य ठिकाणी हलविण्याचा पर्याय असल्यास तो खर्च संबंधित तक्रारदाराने करावा लागतो.
माने, अधीक्षक अभियंता, महावितरण