तक्रारीनंतरही पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
| महाड | प्रतिनिधी |
ऐतिहासिक महाड छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पद्स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याठिकाणी मटका, जुगार, भिंगरूट अशा प्रकारचे अवैध धंदे तेजीत आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार तक्रारी करुनसुद्धा पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी केला आहे. प्रशासनाविरोधात मोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
गेली अनेक वर्षे खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरु करण्यात आली आहेत.
महाड शहरात नवीन येणार्या अधिकार्यांकडून तात्पुरती धमक दाखवत हे व्यवसाय काही दिवसांकरिता बंद ठेवले जातात. मात्र, अवघ्या काही दिवसात हे व्यवसाय पुन्हा सुरु केले जातात. याबाबत आता समाजसेवक सुभाष मोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण झाले आहे. या पुतळ्याच्या आजूबाजूला टपर्या टाकून मटका व्यवसाय सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर मटकामुक्त झाला पाहिजे, अशी मागणीदेखील सुभाष मोरे यांनी केली आहे.
सध्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु झाली आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. शहरातील छ. शिवाजी चौक परिसरालादेखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपर्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. मासेमारी, मजुरी करून दिवसभरात कमावलेले पैसे या मटका आणि भिंगरुटसारख्या खेळांवर उधळले जात आहेत.
बिरवाडीमध्येदेखील मटका व्यवसाय तेजीत
महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमधून असलेले कामगार, चालक, मजूर हे दिवसा मेहनत करून कमावतात आणि संध्याकाळी ऑनलाईन लॉटरी, मटक्यावर खर्च करतात. पैसे मिळाले नाही तर त्यांची पावले चोरी करण्याकडे वळतात. बिरवाडीमध्ये जवळपास आठ ते दहा मटका दुकाने असल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली. लोकसंख्या वाढत असली तरी बाजारपेठ छोटी असल्याने ही दुकाने सहज शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पडतात. बिरवाडीमध्येदेखील पोलीस कारवाई कुचकामी ठरत असल्याने हे मटका व्यावसायिक आपले कोणी बिघडवू शकत नाहीत या अविर्भावात आहेत.
पोलिसांची थातुरमातुर कारवाई
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी काही दिवसांपूर्वी थातूरमातूर कारवाई केली. मात्र, काही दिवसातच हे मटका व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. संतोष जाधव यांनी यावेळी ज्या ज्या वेळेस अवैध व्यवसाय सुरूच दिसेल, त्या त्यावेळेस कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.