बेशिस्त पार्किंगचा अग्निशमनला अडथळा

| पनवेल | प्रतिनिधी |

कामोठे परिसरातील टर्निंग पॉइंटवरील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्याच्या वळणांवर दुतर्फा उभी केली जाणारी वाहने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, आता आपत्कालीन सेवांनाही त्याचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. कामोठे सेक्टर 12 येथे लागलेल्या आगीच्या घटनेदरम्यान टर्निंग पॉइंटवरील वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचताना अडथळे आणि विलंबाचा सामना करावा लागल्याची परिस्थिती निर्माण झाली.

कामोठ्यातील टर्निंग पॉइंटवर बेशिस्त पार्किंग ही रोजची समस्या बनली आहे. या वाहनांमुळे सामान्य नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतातच; शिवाय महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांनाही मार्ग काढणे कठीण होते. अनेकदा रुग्णवाहिकांनाही वळण घेण्यासाठी कसरत करावी लागते. मात्र, आगीच्या घटनेत अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळे निर्माण होण्याची वेळ आल्याने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास होणारा विलंब मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेचा विषय बनला आहे.

Exit mobile version