वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

। वडखळ । प्रतिनिधी ।

वडखळ परिसरात अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, गांजा, एमडी, गुटखा आणि मटका व्यवसाय पुन्हा एकदा खुलेआम फोफावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत तब्बल एक किलो गांजा जप्त करण्यात आला असला, तरी ही कारवाई म्हणजे केवळ वरवरची धूळफेक असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

एकीकडे वडखळ परिसरात मोठ्या उद्योगांमुळे, विशेषतः जेएसडब्ल्यूसारख्या कंपन्यांमुळे परप्रांतीयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, रोजगाराच्या आडून काही घटकांकडून अवैध धंद्यांना खतपाणी घातले जात असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, वडखळ परिसरात आता व्यसनांचा काळाबाजार उघडपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, दोन ते तीन वर्षांपूर्वी याच वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिर्णे खोऱ्यात एमडी ड्रग्ज निर्मितीचा प्रकार उघडकीस आला होता. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही पोलिसांनी धडा घेतला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, अधूनमधून एखादी किरकोळ कारवाई करून पोलीस प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. एक किलो गांजा पकडला म्हणजे संपूर्ण रॅकेट संपलं का? की हा फक्त बर्फाच्या डोंगराचा टोक आहे? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना हे सगळे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? कोणाचे राजकीय किंवा स्थानिक संरक्षण या धंद्यांना मिळत आहे? याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का? अशी कुजबूज आता उघडपणे सुरू झाली आहे.

आज वडखळमधील तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे. गल्लोगल्ली सहज उपलब्ध होणारा गांजा आणि इतर अमली पदार्थ तसेच मटक्याचे अड्डे भविष्यात मोठा सामाजिक स्फोट घडवू शकतात. मात्र, पोलिसांची भूमिका पाहता, धाडी फक्त दिखाव्यासाठी आणि धंदे मात्र जोमात, अशी भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. वेळेत कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही, तर वडखळची ओळख उद्योगनगरी म्हणून नव्हे, तर अवैध धंद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून होईल, अशी भीती आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Exit mobile version