। पेण । प्रतिनधी ।
वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बायपास पुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 71 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
वडखळ येथे गांजा विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वडखळ येथे सापळा रचला. यावेळी आरोपी धर्मेंद्र विलास भगत (वय 45 वर्ष,रा. चरी अलिबाग) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल नं. एमएच 06 सीओ 7080 वर वडखळ येथील बायपास पुलाजवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अधिक तपास केला असता त्याच्याकडून प्लास्टीक गोणीमध्ये सुमारे 5.960 किलो वजनाचा उग्र वास असलेला ओलसर हिरव्या रंगाचा प्रतिकिलो 12 हजार रूपयांप्रमाणे 71 हजार 670 रूपये किंमतीचा गांजा केला. तसेच त्याच्या जवळील खाकी रंगाची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.