। शिहू । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून रायगड जिल्हात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हात अलर्ट मोडवर असून 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. यात अनेक जणावंर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, पेण तालुक्यातील शिहू विभागात बेकायदेशीर गावठी दारू विक्री तेजीत असून आदर्श आचारसंहितेचे नियम फाट्यावर मारल्याचे चित्र पाहावयला मिळत आहे.
पेण तालुक्यातील शिहू विभागातील कुहीरे नजीक असलेली आयनावाडी, शिहू फाटा, गांधे, चोळे, आंबेराई, गांधे आदिवासीवाडी येथे सर्रास गावठी दारू विक्री केली जात आहे. तसेच, बियर शॉपच्या नावाने चढ्या भावात मद्यविक्री केली जात आहे. दारूच्या आहारी जाणारी तरुणपिढी ही 25 ते 30 वयोगटातील असून याचा त्रास कुटुंबाला भोगावा लागत आहे. या दारू व्यवसायिकांवर कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.