| पनवेल | वार्ताहर |
ढोल ताशांचा गजर, बेंजोचा तालात, गुलालाची उधळण करीत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात पनवेलमध्ये गणेश भक्तांनी भक्तिभावाने पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी रात्री उशिरापर्यंत एकूण 13,495 पाच दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये 10,759 पारंपारिक जलस्रोत, 2,527 कृत्रिम तलाव तर पनवेल महापालिकेने राबविलेल्या श्री गणेश मूर्तीदान उपक्रमात 209 गणेशमूर्त्या दान करण्यात आल्या.
यावेळी प्रभाग समिती खारघरमध्ये एकूण 4,170 गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये 3,144 पारंपारीक जलस्रोतात, 904 कृत्रिम तलावात तर श्री गणेश मूर्तीदान केंद्रामार्फत 122 गणेशमूर्त्या विसर्जित करण्यात आल्या. तर प्रभाग समिती कळंबोलीमध्ये पारंपारीक जलस्रोतात 4,077, 457 कृत्रिम तलावात तर श्री गणेश मूर्तीदान केंद्रामार्फत 28 याप्रमाणे एकूण 4,562 गणेशमूर्त्यांचे नियोजनबद्ध विसर्जन पार पडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी, विसर्जन घाटांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर विसर्जन घाटांवर पोलीस मदत केंद्रही उभारण्यात आले होते.
पनवेलमध्ये 13,495 गणेशमूर्तींचे विसर्जन
