अफगाणिस्तानमधील विद्यापीठांमध्ये नव्या नियमांचा अंमल

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून नवनवीन आदेश जारी केले जात आहेत. त्यातच आता तालिबान मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत देखील कडक कायदे करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुमारे 40 सार्वजनिक विद्यापीठे आहेत. तालिबानने महिला-पुरुष सहशिक्षणावर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर आता उच्च शिक्षण मंत्रालयाला राज्य विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याची योजना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सद्यःस्थितीत बहुतेक विद्यापीठांनी मुलींना पडदे असलेल्या वर्गात किंवा क्यूबिकल्समध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काबूल विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलं की, तालिबान्यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद देताना लिंगभेदाची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, विद्यापीठाला महिला विद्यार्थ्यांचे त्यांच्या स्थानिक प्रांतांमध्ये स्थलांतर करण्याबाबत विचार करण्यास सांगितले आहे. पण काबूल विद्यापीठाचा स्वतःचा वेगळा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये घेऊन जाणे शक्य नाही. तालिबानचं असेही म्हणणे आहे कि, महिला विद्यार्थ्यांसाठी फक्त महिला शिक्षिकाच असाव्यात. मात्र, हे शक्य नाही कारण महिला शिक्षकांची संख्या खूप कमी आहे.

Exit mobile version