। काबूल । वृत्तसंस्था ।
तालिबानने संपूर्ण पंजशीर खोर्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. पण नॅशनल रेसिस्टन्स फ्रंटने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. पंजशीरमध्ये नेमकी काय स्थिती आहे? ते लवकरच समोर येईल. या लढाईत रेसिस्टन्स फ्रंटने फहीम दाश्ती आणि जनरल साहीब अब्दुल वादूद हे आपले दोन महत्त्वाचे योद्धे गमावले आहेत. फहीम दाश्ती रेसिस्टन्स फ्रंटचा प्रवक्ता होता, तर जनरल साहीब अब्दुल वादूद हा अहमद मसूदचा भाचा होता. दरम्यान अहमद मसूदने शस्त्रसंधीचा पाठवलेला प्रस्ताव तालिबानने फेटाळून लावला आहे. अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली रेसिस्टन्स फोर्स इथे लढत आहे. तालिबानने वीजेसह रसद पुरवठ्याचे त्यांचे सर्व मार्ग बंद केले होते. रेसिस्टन्स फोर्सने युद्ध थांबवण्याची मागणी केली होती. पंजशीर खोर आतापर्यंत तालिबानला कधीही जिंकता आलं नव्हतं. पण आता मात्र पंजशीर त्यांच्या नियंत्रणात येणार असं दिसत आहेत. मागच्या एक-दोन दिवसात पंजशीर खोर्यात रेसिस्टन्स फोर्सचं मोठं नुकसान झालं आहे. धार्मिक विचारवंतांनी आवाहन केल्यानंतर अहमद मसूदने शस्त्रसंधी आणि सैन्य मागे घेण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तालिबानने पंजशीर खोर्यात लष्करी कारवाई थांबवली, तर शांततेसाठी नॅशनल रेसिस्टन्स फोर्सही युद्ध थांबवेल. विचारवंत आणि सुधारणावाद्यांशी आम्ही चर्चा करु असे मसूदने रविवारी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.f