पाच कोटींच्या जमिनीसाठी तोतयांचा डाव

तलाठी म्हस्के यांच्या निलंबनासाठी आमरण उपोषण

| पनवेल | प्रतिनिधी |

नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत तोतया व्यक्ती उभ्या करून तब्बल 5 कोटी रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप पनवेल तालुक्यातील मालढुंगे सजा तलाठी वल्लभ म्हस्के यांच्यावर करण्यात आला आहे. मूळ वारसदाराकडे 25 लाख रुपयांची मागणी केल्याचाही गंभीर आरोप असून, महसूल यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठ्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी 1 डिसेंबरपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी दिला आहे.

पनवेल तालुक्यातील देहरंग येथील सर्व्हे क्रमांक 1/य/23 या मिळकतीबाबत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. 1965 मध्ये ईरीनमेरी प्रोन्सेका यांनी मुलांसाठी एक एकर पाच आर क्षेत्रातील आठ प्लॉट खरेदी केले होते. या जमिनीचे गुंतवणूकदार मुंबई-पुण्यात राहात असल्याने फेरफार नोंदी झाल्या नव्हत्या. याचाच फायदा घेत नावातील साधर्म्य असलेल्या व्यक्तींना पुढे करून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचे ढवळे यांनी निवेदनात म्हटले आहे. मुग्धा सातारकर यांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी तलाठी वल्लभ म्हस्के यांच्याकडे वारस नोंदीसाठी अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केला होता. मात्र, सुमारे चार महिने त्यावर कार्यवाही झाली नाही.

दरम्यान, वेरनॉन सिसिलीया प्रोन्सेका यांच्या वारस रेखा सदर यांनी पनवेल दिवाणी न्यायालयात सीए क्र. 1054/24 अंतर्गत वारस दाखल्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने 5 जानेवारी रोजी त्यांच्या नावे वारस दाखला दिला. त्यानंतर रेखा सदर यांनी 27 जानेवारी 2026 रोजी प्रतिज्ञापत्रासह तलाठ्यांकडे वारस नोंदीसाठी अर्ज केला. यावेळी तलाठी म्हस्के यांनी त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी तलाठ्यांनी अपर तहसीलदारांना पत्र देऊन या मिळकतीबाबत दोन अर्ज प्राप्त झाल्याचे कळविले. तसेच, मृत्युपत्र क्रमांक 3/44/44/2008 च्या आधारे नोंद घेण्याबाबत मत व्यक्त केले.

3 जून रोजी तलाठ्यांनी मुग्धा सातारकर आणि रेखा सदर यांना फेरफार क्रमांक 207 ला आव्हान देण्यास सांगितले. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी मुग्धा सातारकर यांच्याकडून पुन्हा अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या अर्जाची मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून मृत्युपत्रातील तारीख व वेळेच्या त्रुटींचा उल्लेख करत प्रकरण वरिष्ठांकडे पाठविण्याचा अहवाल दिला. मात्र, 7 सप्टेंबर रोजी तलाठ्यांनी टिपणी सादर करून जमीन महसूल अधिनियम 1955 नुसार फेरफार दुरुस्तीचे आदेश देण्याची विनंती केली. न्यायालयाने रेखा सदर यांना दिलेला वारस दाखला मान्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी न्यायालयात अपील करावे, असे मतही तलाठ्यांनी मांडल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, दोन वेगवेगळ्या महिलांच्या दस्तांवरील सह्यांचा आहे. 24 नोव्हेंबर 1965 रोजी ईरीनमेरी प्रोन्सेका यांनी केलेल्या खरेदीखतावर त्यांच्या सह्या आहेत, तर 2008 मध्ये नोंदणीकृत मृत्युपत्रावर आयरीन अल्बर्ट प्रोन्सेका यांच्या सह्या आहेत. दोन्ही दस्तांवरील सह्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या असल्याचा दावा ढवळे यांनी केला आहे. आयरीन अल्बर्ट प्रोन्सेका यांचा मृत्यू 24 ऑगस्ट 2010 रोजी पुणे येथे झाला, तर ईरीनमेरी प्रोन्सेका यांचा मृत्यू 24 डिसेंबर 2002 रोजी दिल्ली येथे झाला होता. दोघींच्या नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन सुमारे 5 कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने 16 ऑक्टोबर रोजी अपर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अपर तहसीलदारांनी तलाठी वल्लभ म्हस्के यांना मालढुंगे सजा येथून हटवून पुढील निर्णय होईपर्यंत सुंदरे सजेतील तलाठ्यांकडे मालढुंगे सजाची जबाबदारी सोपविली. दरम्यान, रेखा सदर यांनी 25 लाखांची मागणी केल्याबाबत अपर तहसीलदारांकडे सत्यप्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसारी खुर्द येथील नवनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तलाठी वल्लभ म्हस्के यांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, जमीन हडपण्याच्या कथित प्रयत्नाची चौकशी करावी आणि मूळ मालकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी अनिल ढवळे हे 1 डिसेंबर रोजी पनवेल येथील नवीन प्रशासकीय भवनातील अपर तहसीलदार कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड आणि अपर तहसीलदार पनवेल यांना देण्यात आले असून, महसूल मंत्री, कोकण विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी पनवेल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे.

Exit mobile version