24 तासात तपास पुर्ण केल्याने त्वरीत निकाल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हद्दपार करण्यात आलेला आरोपी पुन्हा आपल्या गावात आल्याने श्रीवर्धन पोलिसांनी कारवाई करीत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता हद्दपारीचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली श्रीवर्धनचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली जवळगेकर यांनी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे सदर आरोपी गावात आल्याची गोपनिय बातमीद्वारे माहिती मिळताच त्याच्यावर श्रीवर्धन पोलिसांनी तत्परतेने 24 तासात कारवाई करुन कोर्टात दाखल केल्याने त्याला त्वरीत शिक्षा झाली असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बिलाल इस्माईल जिवरक, रा. वाळवटी, ता. श्रीवर्धन असे या आरोपीचे नाव आहे. 17 मे 2022 रोजी त्याला एक वर्षासाठी श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा, महाड, पोलादपूर आणि मुरुड या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानुसार 31 मे रोजी त्याला केळशी, जि. रत्नागिरी येथे सोडून देण्यात आले होते. असे असतानाही 20 जुलै रोजी बिलाल जिवरक हा वाळवटी गावात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन हद्दपारीची उल्लंघन करुन आल्याबाबत त्याच्याविरोधात महाराष्ट्र कायदा कलम 56 1(ब) चे उल्लंघन केल्याने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला 6 महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. यासंबंधी तपासी अंमलदार पोलिस हवालदार दयानंद सरकाटे यांचा तपास महत्वपूर्ण ठरला. तर कोर्ट अंमलदार पोलीस हवालदार शिवाजी बोडखे यांचे सहकार्य लाभले.