मुरूडमध्ये नाचवतात मानाच्या शासनकाठ्या

चार दिवस जत्रेचा धुरळा तर करोडोंची उलाढाल

। कोर्लई । वार्ताहर ।

मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावागावातून मानाच्या शासनकाठ्या नाचवल्या जातात. चार दिवस उत्साहात होणार्‍या जत्रेतून करोडोंची उलाढाल होत असते.

चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्‍वरी देवीच्या पालखी सोहळ्यापासुन या उत्सवाला सुरुवात होते. दुसर्‍या दिवशी चैत्र पौर्णिमेला तेलवडे गावात जत्रा होते, तिसर्‍या दिवशी खार आंबोली व शेवटी शिघ्रे गावात जत्रा होते. मुरुड, तेलवडे, खार अंबोली, शिघ्रे अशी चार गावांत सलग चार दिवस जत्रोत्सव असतो. या चैत्र महिन्यात शासन काठ्या नाचवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे ती आजतागायत जपली जात आहे.

तालुक्यातील सुमारे 12 ते 15 गावातील शासन काठ्या या जत्रेत वाजत गाजत, नाचत येतात, जत्रेत आल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असताना शासन काठी नाचवली जाते कधी एका हातावर घेऊन, कधी खांद्यावर, कधी डोक्यावर तर कधी हनुवटीवर हे पाहण्यासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी होत असते. ही काठी नाचवताना उंच उंच आभाळात अभिमानाने डौलत कधी जमीनीच्या दिशेने पडत असते. त्यावेळी बघणार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि काठी सांभाळणारे पुन्हा काठी आभाळाच्या दिशेने उभी करून नाचवू लागतात. हा चित्तथरारक अनुभव पहाणार्‍यांना येत असतो.

या जत्रेमध्ये विविध स्टॉल लावले जातात. यामध्ये मिठाई, भजी, कटलरी, आईस्क्रीम, उसाचा रस, सौंदर्य प्रसाधने, नाव गोंदवणे, विविध प्रकारचे कपडे, घरगुती सामान, विविध लहान मुलांचे खेळ यांचा समावेश असतो. त्यामुळे या जत्रेत मोठ्या उत्साहात लाखो लोक भेट देतात. चार दिवसात करोडोंची उलाढाल होत असते.

Exit mobile version