। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या किंवा श्रावण अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. जिल्ह्यात देखील काही शेतकरी या सणाला विशेष महत्त्व देतात. बैलांना गोडधोड खाऊ देतात. व सजवतात देखील करतात. शर्यतीच्या बैलांचादेखील येथे वेगळा थाट आहे.
यांत्रिकीकरणाच्या युगातही पाली सुधागड सह जिल्ह्यात अनेक शेतकरी अजुनही शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा नांगराला पसंती देत आहेत. भात शेती तुकड्यामध्ये विभागली आहे. डोंगर उताराला लागून असलेली व दुर्गम आणि दुरच्या पल्ल्यातील शेती, शेताभोवती असलेले बांध यामुळे तेथे ट्रॅक्टर नेणे व नांगरणी करणे गैरसोयीचे होते. मात्र नांगर व बैल कुठेही सहज नेले जाऊ शकतात. बैल नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जावून जमीन अधिक भुसभूशीत करतो. त्यामूळे पेरणी करणे सोप्पे जाते. शेतात बैलाचे पाय पडणे हे अनेकांना शुभ वाटते.
माल वाहतुकीसाठी वापर
जिल्ह्यातील काही गावात अजुनही धान्य, पेंढा किंवा शेतीला लागणारे समान ने-आण करण्यासाठी बैलगाडी वापरली जाते. विज्ञान व तंत्रज्ञानाने शेतकर्यांना सुखाचे दिवस दाखवले आहेत. अजुनही शेतीसाठी, धान्य किंवा समान ने-आण करण्यासाठी तसेच विविध कामांसाठी बैलगाडीचा वापर करताना दिसत आहे.
शर्यतीच्या बैलांचा थाट
जिल्ह्यात पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत या ठिकाणी बैलगाडा शर्यती जोमात होतात. तसेच बैलगाडा शर्यतीचे शर्यतप्रेमी जिल्ह्यात सर्वत्रच आहेत. पनवेल, उरण, कर्जत या ठिकाणी बिनजोड शर्यती खुल्या मैदानात होतात. तर अलिबागमध्ये समुद्राच्या वाळूवर शर्यती होतात. शर्यत बघण्यासाठी हजारो लोक जमतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कुठेही बैल पळवला तरी रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईत बैल पाळल्यानंतरच त्याची खरी किंमत किंवा प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे येथील शर्यतींना संपूर्ण महाराष्ट्रात महत्व आहे. या बैलांचा खुराक व थाट काही औरच असतो. त्यांची अगदी घरातील माणसाप्रमाणे बडदास्त राखली जाते असे पनवेलजवळील ओवळे येथील शर्यतप्रेमी व बैलवाले रुपेश मुंगाजी यांनी सांगितले.