ग्रामीण भागात खालुबाजाचा सूर हरपला

| मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |
श्रावण महिन्यातील गोपाळकाळाच नव्हे, तर गणेशोत्सव, विशेषतः ग्रामीण भागात होणाऱ्या विवाह समारंभात खालुबाजा वाजल्याशिवाय उत्सव साजरा होत नव्हता. काळाच्या ओघात आता नवीन वाद्यांना पसंती दिली जात असल्याने खालुबाजाचा सूर हरपल्याचे चित्र आहे.

ढोल, सनई आणि टिमकी या केवळ तीन वाद्यांच्या साथीने वाजंत्री विविध समारंभात रंगत आणायचे. तासंतास घाम गाळणाऱ्या वाजंत्र्यांना ग्रामीण भागात आजही तेवढाच मान मिळतो. परंतु गावागावातून बेंजो पथक निर्माण झाले, नाशिक बाजा, ढोल पथक तसेच डिजेला मागणी वाढू लागली आणि वाजंत्र्यांचा मान कमी होऊ लागला. पारंपरिक वाद्यांना मागणी कमी झाली आहे.

खालुबाजा वाजविणे म्हणजे स्वतःच्या इमेजला धक्का लागत असल्याच्या समजुतीवरुन ग्रामीण भागातील तरुणांचे या कलेकड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही कलाच नामशेष होत आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे. जुने वयोवृद्ध वाजंत्री सोडल्यास तरुण वाजंत्र्यांची वानवा ग्रामीण भागात आज सतत जाणवत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बहुतांशी राजकारण्यांनी गावागावातील तरुण मंडळांना बेंजो सेट भेट स्वरुपात दिले आहेत. अशी वाद्य आयती मिळत असल्याने तरुण खालुबाजा सारख्या वाद्यांच्या मागे वेळ घालवत नसल्याचे चित्र आहे.

खालुबाजा वाजविणे तसे कष्टाचे काम आहे. मिवरणुकीत नाचणारी मंडळी व अन्य खालुबाजा बरोबर स्पर्धा लागल्यास सर्वस्व पणाला लावावे लागते. अन्य बाजांच्या तुलनेत खालुबाजाला फारसा वाव मिळत नाही. हे खरे आहे.

हशा ढोलके, वाजंत्री-खारीकवाडा

हल्लीच्या काळात तरुण मंडळींना खालुबाजा आवडत नाही, तर त्यांना डीजे , बेंजो, ढोल पथकाच्या तालावर थिरकायला आवडते. परंतु खालुबाजा हे पारंपरिक वाद्य आहे. आमच्या वाडवडिलांकडून ही कला मिळाली आहे. कलेसाठी कला, की जीवनासाठी कला हा विचार मी तेथे करीत नाही.

दगडू ठाकुर, वाजंत्री-नांदगाव

तरुणांनी वाजंत्र्यांची कला शिकून ती जपली पाहिजे, नाही तर काळाच्या ओघात तीचे अस्तित्वच राहणार नाही अशी भीती वाटते.

ऋषिकांत पाटील, वाजंत्री- मजगाव
Exit mobile version