| पेण | प्रतिनिधी |
वै.ह.भ.प. नामदेव महाराज आणि वै. ह.भ.प. सखुवाई नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ म्हात्रे परिवाराच्या वतीने वडखळ बसस्थानकावर पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम) आणि एस.टी. महामंडळाचे डी.टी.ओ. संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे वडखळ बसस्थानकातून कोकणाकडे तसेच विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
उन्हाळ्यासह वर्षभर प्रवाशांची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई उपयुक्त ठरणार असून, म्हात्रे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एस.टी. महामंडळाच्या अपर्णा वर्तक यांनीही म्हात्रे परिवाराने वडखळ बसस्थानकावर पाणपोई उभारून प्रवाशांसाठी केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोकल, सुनील जांभळे, विनोदिनी कोळी, जयश्री म्हात्रे, योगिता मोकल, रवींद्र म्हात्रे, कोमल म्हात्रे, संजय पवार, नूतन म्हात्रे, अपूर्वा म्हात्रे, मनाली पाटील, महेंद्र पाटील, सचिन पाटील यांच्यासह एस.टी. महामंडळाच्या आगारप्रमुख स्नेहल सरडे, अर्चना खराडे, वाहतूक नियंत्रक वडखळ अतुल पाटील, महादेव दहिफळे आदी उपस्थित होते. पाणपोई उभारणीसाठी प्रभाकर म्हात्रे, प्रकाश म्हात्रे आणि विश्वास म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.







