| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील उन्हेरे बु. येथे फळ प्रक्रिया उद्योगाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अक्षता सुमित अधिकारी आणि संजीवनी संजय चव्हाण यांनी उद्योगाची सुरुवात करून कोकणातील फळांचे मूल्यवर्धन करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
उद्योगासाठी पल्प तयार करण्याचे मशीन, ज्यूस मशीन, कटिंग मशीन आणि पॅकेजिंग मशीन खरेदी करण्यात आले आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या आंबा, जांभूळ, फणस, करवंद, कोकम यांसारख्या फळांवर प्रक्रिया करून कोकणी मेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. उद्योगातून जाम, जेली, चॉकलेट आणि पल्प यांसारखे विविध पदार्थ तयार होतील. दररोज किमान 500 किलो फळांवर प्रक्रिया करण्यात येणार असल्याने कोकणातील फळांपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार होतील आणि फळांची नासाडी टाळली जाईल.
या प्रकल्पाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे सहकार्य लाभत आहे. तसेच तालुका कृषी विभाग सुधागड आणि जिल्हा संसाधन व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उद्योगाला चालना मिळत आहे. कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम, मंडळ अधिकारी उदय भोसले, कृषी सहाय्यक जगदीश कंठाळे, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजित जाधव, चिखलगावचे ग्रामसेवक श्री. हिरे, स्वदेश फाउंडेशनचे रायगड जिल्हा प्रमुख प्रदीप साठे आणि बचतगट सीआरपी उपस्थित होते.







