नागपुरात मोदी एक्स्प्रेस सुसाट

समृद्धीचे महामार्ग, नागपूर मेट्रो 1 चे लोकार्पण; फेज 2 चे भूमिपूजन

| नागपूर | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मोदी एक्स्प्रेस रविवारी नागपुरात सुसाट धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो 1 चे लोकार्पण आणि मेट्रो 2 चे भूमिपूजनासह अन्य विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोदी यांनी शिंदे, फडणवीस सरकारचा उल्लेख डबल इंजिनचे सरकार करीत शिंदे यांची पाठ थोपटली.


उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात देशाच्या तिजोरीतील पैसा आणि सामान्य करदात्यांची कमाई उधळून लावत आहेत. या स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची गंभीर धोका आहे. त्यामुळे कोणतेही पायाभूत प्रकल्प उभारताना त्यामागे दीर्घकालीन धोरण आणि शाश्‍वव विकासाचा दृष्टीकोन असला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मराठीतून भाषणाचा प्रारंभ
मोदींनी आपल्या भाषणाचा प्रारंभ मराठीतून केला. ते म्हणाले टेकडीच्या गणपतीला माझं वंदन. आज संकष्टी चतुर्थी आहे. या विकास कामांचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. या महामार्गामुळे रोजगार मिळेल. तर उद्घाटनामुळे आरोग्य मिळेल, त्याचबरोबर सगळीकडे मेडिकल कॉलेज असतील. त्याचबरोबर देशभरातील प्रार्थना स्थळांचा विकास होतो आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळे काम जलद गतीने होत आहे, असे ते म्हणाले.


शिंदेंचा ठाकरेंवर ठपका
एकनाथ शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याचं सूचक विधान केलं. आज मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचं लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतल्याचं बोललं जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भाषणे झाली.

मोदींचे फोटोसेशन
मोदी हे अकराच्या सुमारास वायफळ टोलनाक्यावर आले. याठिकाणी त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. तेव्हा त्यांच्या शेजारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी मोदी यांचे नेहमीप्रमाणे फोटोसेशन सुरु होते. त्यांची छबी टिपण्यासाठी कॅमेरामन्सची धावपळ सुरु होती. हे कॅमेरामन्स पंतप्रधान मोदी यांचे फोटो काढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फ्रेममधून बाजूला झाले. जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो व्यवस्थित येतील. मात्र, फोटो काढत असताना ही बाब मोदी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना खांद्याला धरून आपल्या बाजूला उभे केले. त्यानंतर मोदींनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.


ढोलही वाजविला
वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी लेझीम आणि ढोलपथक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्घाटनावेळी या लेझीम आणि ढोलपथकाच्या जवळ केले. नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला. तसेच ढोलपथकातील एका वाजंत्र्याकडून काठी घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीने ढोलपथकातील कलाकारांचा उत्साह चांगलाच वाढला. मोदींचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जनतेशी परिणामकाररित्या संवाद कसा साधायचा किंवा त्यांना भावेल, अशी कोणती कृती करायची, यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी लगावलेले हे दोन मास्टरस्ट्रोक सगळ्यांच्या नजरेत भरणारे ठरले.

Exit mobile version