| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या स्वनिधीतून साकार झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे रविवारी (दि.12) ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या योजनेमुळे पायरीचीवाडीतील नागरिकांना आता शुद्ध आणि नियमित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांसाठी हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. उद्घाटनाप्रसंगी सुरेश खैरे यांच्यासह सतीश खाडे, अरुण खाडे, दत्ता खाडे, रामचंद्र शिलकर, नामदेव शिर्के, कृष्णा जाधव, श्रीपत जाधव, किसन खाडे, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरेश खैरे यांनी, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले आणि सुरेश खैरे यांचे आभार मानले.
नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
