मिळकतखार येथील घटना! आगीच्या भडक्यात विवाहिता भाजली

मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल

|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


मिळकतखार येथे चुलीवर स्वयंपाक करताना अचानक आगीचा भडका उडाल्याने 22 वर्षीय विवाहित महिला गंभीररीत्या भाजली. या घटनेत महिला सुमारे 50 टक्के भाजल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना अपघाती नसून, महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मिळकतखार येथील 22 वर्षीय विवाहित महिला सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घरातील चुलीवर स्वयंपाक करत होती. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला आणि त्यात ती गंभीररित्या भाजली. कुटुंबियांनी तिला तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिला सुमारे 50 टक्के भाजल्याने तिची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


दरम्यान, महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे ही घटना नेमकी अपघाती आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version