| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील सुकेळी येथील मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या हॉटेल आशीर्वादमध्ये काम करणाऱ्या 20 वर्षीय नेपाळी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औताल उर्फ सुशांत बी. के. नावाचा हा नेपाळी तरुण मूळचा ऋषीडरा, जिल्हा – तनलू, वॉर्ड क्रमांक 3 , नेपाळ येथील रहिवासी आहे. कौंटुबिक कारणातून नैराश्य आल्याने या नेपाळी तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नेपाळी तरुणाने यापूर्वी सुकेळी येथील हॉटेल आशीर्वादमध्ये चायनीज पदार्थ बनविणारा कूक म्हणून काम केले होते. त्यानंतर एक दीड वर्षांच्या मधल्या काळात त्याने आशीर्वाद हॉटेल मधील काम सोडून या तरुणाने 8-10 दिवसांपूर्वीच हॉटेल आशीर्वाद मध्ये पुन्हा काम सुरू केले होते. आशीर्वाद हॉटेलच्या वरील बाजूस टेरेस वर असलेल्या शेडमध्ये हॉटेल कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या खोल्यांमध्ये हा नेपाळी तरुण इतर कामगारांसोबत राहत होता. गुरुवारी (दि.15) रोजी रात्री इतर दोन कामगार सहकाऱ्यांसोबत गप्पा झाल्यानंतर हा तरुण त्याच्या खोलीत एकटाच झोपी गेला होता. त्यानंतर मध्यरात्री या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या टेरेसवरील दुसऱ्या खोलीत असलेला सहकारी कामगार उठल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आशीर्वाद हॉटेलचे मालक संतोष खाडे यांना याविषयी माहिती दिली. नंतर संतोष खाडे यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिल्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे करीत आहेत.