तीस टक्के उत्पादनात घट
। अलिबाग। प्रमोद जाधव ।
कोकणातील आंबा तयार होऊन बाजारात दाखल होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. आंब्याच्या उत्पादनात तीस टक्के घट झाल्याचे आंबा उत्पादक शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे.
कोकणासह रायगड जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांची संख्या वाढू लागली आहे. भात पिकाबरोबरच पर्यायी शेती म्हणून आंबा लागवडीवर शेतकर्यांनी भर दिली आहे. आंब्यासह इतर फळ पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे आंब्याचे क्षेत्रही वाढू लागले आहे. जिल्ह्यात 17 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. आंबा तयार होऊन काढणीच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी काढणी करून बाजारातदेखील विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अवकाळी पावसासह कधी ढगाळ तर कधी कडक ऊन या बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. आंब्याच्या उत्पादनात 30 टक्केहून अधिक घट झाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दोन डझन आंब्यामागे एक हजार ते एक हजार 200 रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते. परंतु, आता आंब्याच्या दरात 40 टक्केहून अधिक घसरण झाल्याचे आंबा उत्पादक शेतकर्यांनी सांगितले आहे. आता दोन डझन आंबे पाचशे ते सहाशे रुपयांना विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. आंब्याच्या उत्पादनात घट असताना विक्रीत ही घट झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
आंब्याची झाडे कमी होण्याच्या वाटेवर
झिराड, किहीम मुशेत या परिसरात आंब्याच्या वाड्या मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकर्यांकडून आंब्याची वाडी घेतली जाते. त्यातून रोजगाराचे साधन निर्माण होते. परंतु, गेल्या काही वर्षापासून या परिसरात जागेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे धनदांडग्यांकडून मोठमोठ्या आंब्याच्या वाड्या विकत घेतल्या जात आहे. ती झाडे तोडून त्याठिकाणी रिसॉर्ट व अन्य हॉटेल उभारणीचे काम केले जात आहे. त्यामुळे आंब्याच्या झाड्यांची तोड केली जात असल्याने ही झाडे कमी होण्याच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कमी उत्पादनामुळे शेतकरी चिंताग्रस्त
आंब्यला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने रायगड जिल्ह्यातील आंब्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोकणीसह रायगडमधील आंब्याच्या नावाने बाहेरच्या राज्यातून येणार्या आंब्याची विक्री होण्यावर अंकूश राहिला आहे. भौगोलिक मानांकनामुळे आंब्याला दर्जा प्राप्त झाल्याने शेतकरी सुखावून गेला. मात्र, यंदा आंब्याचे उत्पादन कमी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यात अवकाळी पावसासह बदलत्या वातावरणामुळे आंबा विक्रीवरही परिणाम झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कोकणात सुमारे साडेतीन लाख आंबा उत्पादक शेतकरी असून रायगड जिल्हयात 65 हजार शेतकरी आहेत. अवकाळी पावसाबरोबरच बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. आंब्याचे दरही प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत आंब्याचा हंगाम संपणार आहे.
– चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
यावेळी 35 टक्क्याचे उत्पादन आहे. दुसर्या बहरीचा आंबा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहतो. यावेळी दूसरा बहर आलेला नाही. 18 मेपर्यंत आंबा संपून जाण्याची शक्यता आहे.
– रुपेश बुरूमकर, आंबा उत्पादक शेतकरी