। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी नाक्यावरील असलेल्या वन विभागाच्या वाहनतळामध्ये चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलावली. या बैठकीला मुख्याधिकारी, वनक्षेत्रपाल तसेच पोलीस अधिकारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वन विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या चोरीची गंभीर दखल देशपांडे यांनी घेतली आहे. प्रत्येक तीन महिन्यांत होत असलेली चोरी हा विषय खूप गंभीर मुद्दा असून, येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, याचा परिणाम येथील पर्यटनावर होतो. हे टाळण्यासाठी मुख्याधिकारी सुरेखा भणगे, वन क्षेत्रपाल उमेश जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांना तातडीने एका विशेष बैठकीसाठी निमंत्रित केले होते.
यावेळी पार्किंग मधील विकास कामे पूर्ण झाली असून, विद्युत पोलसुद्धा या विकास कामात बसविण्यात आले आहेत. मात्र, वीजपुरवठा होत नाही यावर चर्चा झाली. यामध्ये एमएमआरडीएच्या ठेकेदाराने पार्किंग नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले. मात्र, पार्किंग अजूनही आमच्याकडे हस्तांतरित झाली नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. यावर दोन्ही संस्थांनी बसून एक निर्णय घ्यावा, असे देशपांडे यांनी सांगितले .यावर आठ दिवसात तोडगा काढण्यावर एकमत झाले.