। उरण । वार्ताहर ।
येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्याचा मानस जाहीर केला आहे. हे अभियान नवीन पिढीसाठी मार्गदर्शन करणारे आहे. या अभियानासाठी राज्याच्या ग्रामविकास आणी नगरविकास विभागातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, केवळ हर घर तिरंगा फडकविण्याच्या नादात सरकारला स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभाग घेऊन हौतात्म्य पत्करणार्या देशभक्तांचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळे ब्रिटिशांच्या बेच्छूट गोळीबारात चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे यादिवशी स्मरण व्हावे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित व्हावी, आशी मागणी उरणच्या तमाम जनतेची आहे.
चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात आजूबाजूच्या गावांतील, परिसरांतील सुमारे पाच ते सात हजार लोकांनी भाग घेतला होता. त्यापैकी धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), राम बाम कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (शिंदे) (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंद माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (मूळपाडा) हे ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडले, तर 38 ते 40 जण जखमी झाले. हे सारे जण 20 ते 22 वर्षांचे तरुण होते.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना 4 मार्च 1981 रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी 1981 रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हुतात्म्यांची हुतात्मा स्मारक योजना राबविली. पण, आज हर घर तिरंगा अभियान राबविताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारल्या जाणार्या या महोत्सवाने जरी देशात राष्ट्रभक्तीची लाट उसळत असली, तरी स्वातंत्र्याच्या लढ्यात सिंहाचा वाटा असणार्या आणि स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणार्या हुतात्म्यांचा विसर होता कमा नये, तर त्यासाठी देशभरांतील तमाम हुतात्म्यांना मानवंदना देणे, हीच खरी राष्ट्रभक्ती ठरेल.