कुंभिवलीमध्ये परप्रांतीय मतदारांचा समावेश

| खोपोली | वार्ताहर |

कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील प्रभागात 137 नाव वाढवण्यात आली आहेत. यामध्ये परप्रांतीयांचा समावेश करण्यात आल्याने ती नावे कमी करावीत,अशी मागणी केतन महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रामक पवित्रा घेत निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने निवडणुकीपूर्वीच कुंभिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले आहे.

महाडिक यांनी अर्ज केला तेव्हा 79 नावे अधिक होती. ही नावं कमी होण्याऐवजी वाढून 137 झाली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये परप्रांतीय नावांचा भरणा अधिक झाला आहे. या प्रभागात आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीय मतदार असताना परप्रांतीयांची नावे आली कुठून असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली अनधिकृत नावे तातडीने कमी करावीत, अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर आमचा बहिष्कार राहिल, नाहीतर ही नावे कमी होत नाहीत तो पर्यंत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version