आ. महेश बालदिंच्या समर्थकांचा जाहिर प्रवेश
| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू होणार असून रायगड मधील उरण विधानसभा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी होणारी लढत ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. यातच शेकापचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे संपूर्ण ताकदीने गेल्या पंधरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, रोजगार निर्माण अशा अनेक कार्याच्या जोरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा विधानसभा खेचून आणण्यासाठी संपूर्ण उरण विधानसभा पिंजून काढत आहेत. यामुळे आपला गड राखण्याचे आवाहन आ. महेश बालदी यांच्यासमोर राहणार आहे.
धुतुम येथील महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे अध्यक्ष रोशन ठाकूर यांनी त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आणि मित्र-परिवारासोबत शुक्रवारी (दि.27) प्रितम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मा.आ. बाळाराम पाटील आणि पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी पक्ष प्रवेश करताना सगळेजण स्वतःसाठी काही मागणी ठेवतात आणि प्रवेश करतात. यावेळी सुद्धा ठाकूर कुटुंबीयांनी महेश बालदी यांना आमदार या पदावरून पायउतार करण्याची मोठी मागणी केली आहे. यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि भरघोस मतांनी प्रितम म्हात्रे यांना निवडून आणू असे आश्वासनही दिले आहे.
यावेळी पं.स.मा.सभापती काशिनाथ पाटील, कृउबा स. सभापती नारायण घरत, उरण विधानसभा चिटणीस जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, विभागीय चिटणीस विलास फडके, चिटणीस राजेश केणी उपस्थित होते.