महामार्गावर स्वच्छतागृहां अभावी गैरसोय

महिला, ज्येष्ठांचे हाल

| सुधागड-पाली | वार्ताहर |

असंख्य चाकरमानी व प्रवासी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कामानिमित्त प्रवास करतात. मात्र येथून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांची एक वेगळीच गैरसोय होत आहे. ती म्हणजे या महामार्गांवर शासनातर्फे कोठेही स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नाहीत. परिणामी स्वच्छतागृहा अभावी प्रवाशांची गैरसोय व कुचंबणा होते. महिला व जेष्ठांचे तर खूप हाल होतात. परिणामी प्रवाश्यांना येथील हॉटेल व पेट्रोल पंपाचा आधार घ्यावा लागतो.

तळकोकणातून पुणे व मुंबईकडे अनेक चाकरमानी देखील ये जा करत असतात. शिवाय जिल्ह्यातील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, धार्मिक स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ कायम सुरू असतो. जिल्ह्यातून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई बंगलोर महामार्ग आणि माणगाव दिघी पोर्ट हे मोठे मार्ग जातात. शिवाय इतरही राज्य महामार्ग आहेत. दिवाळीला जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले होते. तसेच पुढील महिन्यात नाताळच्या सुट्टीत लाखो पर्यटक मुंबई, ठाणे व पुण्यावरून मुंबई गोवा महामार्ग तसेच खोपोली-पाली-वाकण राज्य महामार्ग, पाली विळे निजामपूर मार्गे माणगाव आणि इतर राज्य मार्गांवरून जिल्ह्यात फिरतील. त्यांच्यासाठी हे मार्ग अतिशय महत्वाचे आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अजूनही सुरू आहेत. त्यामुळे या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होते. यामुळे प्रवासात इच्छित स्थळी पोहचण्यासाठी नियमित लागणार्‍या वेळेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. परिणामी तासनतास प्रवाशांना वाहनातच बसावे लागते. अशावेळी येथे कुठेही स्वच्छतागृह नसल्याने त्यांची खूप गैरसोय होत आहे.

महामार्गांवर स्वच्छतागृह नसल्याने प्रवाश्यांना पोट धरून बसावे लागते. त्यात खराब रस्ते आणि खड्ड्यांमध्ये वाहने आदळतच जातात. अशा वेळी प्रवाश्यांचा जीव अधिकच कासावीस होतो. त्यांना वेळीच स्वच्छतागृह न मिळाल्याने खूपच हाल होतात. परिणामी काहींना तर मुतखड्याचा त्रास देखील संभवतो. या साठीच महामार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. लांबच प्रवास करतांना नैसर्गिक विधी करण्यासाठी त्यांना कोणताच पर्याय राहत नाही. आणि त्यामुळे लांबचा प्रवास करताना प्रवाशांची मोठी पंचाईत होताां दिसत आहे. सगळ्यात जास्त गैरसोय आणि हाल होतात ते वृद्ध व महिलांचे. अशा वेळी महामार्गावर असणार्‍या हॉटेलचा सहारा या प्रवाश्यांना घ्यावा लागत आहे. तर काही वेळेला पेट्रोल पंपाचा आधार घ्यावा लागतो. पण पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात येणार्‍या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही. आणि प्रामुख्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या प्रवाश्यांनाच याचा लाभ घेता येतो. त्यामुळे इथेही प्रवाशांची मोठी गैरसोयच होते. थंडीत या समस्येचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे. अशा वेळी पुरुष मंडळी कुठेतरी थांबतात किंवा वेळ मारून नेतात. मात्र, महिलांना कोणताच पर्याय राहत नाही.

नियमांना फाटा
वास्तविक रोड टॅक्स व इतर कर भरूनही या मार्गांवर प्रवाशांना नैसर्गिक विधी करण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. स्वच्छ भारत अभियान मोठ्या जोमाने राबविले जात असताना या महामार्गांवर शासनाकडून स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आलेली नाही. नियमाप्रमाणे येथे काही ठराविक अंतरावर स्वच्छतागृह उभारणे बंधनकारक आहे. मात्र, या महत्वाच्या सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
परिवहन महामंडळाच्या स्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शिवाय, या ठिकाणी चांगली स्वच्छतादेखील केली जात नाही. परिणामी, परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचीदेखील गैरसोय होते.

महामार्गावरील ही विदारक परिस्थिती सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने म्हणजेच एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गांवर स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. ही स्वच्छतागृह प्रवाश्यांसह महामार्गावर काम करणार्‍या कामगारांना देखील उपयुक्त ठरतील. त्यामुळे ठेकेदाराने देखील यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रशासनाबरोबर खासगी कंपन्या किंवा स्वयंसेवी संघटनांनी देखील ही सुविधा देण्यास हरकत नाही. या ठिकाणी नाममात्र शुल्क भरण्यास देखील प्रवासी तयार होऊ शकतात. याबरोबरच शहराच्या धर्तीवर महामार्गाच्या शेजारी फिरते टॉयलेट ठेवून प्रवाशांची गैरसोय दूर करता येऊ शकते. मात्र, या सगळ्यासाठी गरज आहे ती प्रशासकीय इच्छाशक्तीची.

सुनील साठे,
अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका

Exit mobile version