| चिरनेर | प्रतिनिधी |
पावसाळी बंदीमुळे करंजा बंदरातील मासळी निर्यात बाजार ही बंद झाला आहे. या करंजा मच्छिमार बंदरातून 2025 मध्ये 30 ते 35 हजार मेट्रिक टन इतक्या मासळीची निर्यात झाली असून, ही राज्यातील निर्यातीच्या 10 टक्के निर्यात आहे. यावर्षी अनेक कारणांमुळे मासळीची आवक कमी असली तरीही निर्यातीत मात्र वाढ झाली असल्याची माहीती मासळी निर्यातदारांनी दिली आहे.
करंजा बंदर हे देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे हब बनू पहात आहे. यात अरबी समुद्रातून पकडलेल्या रिबन फिश, कटल, माकोल, नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप, थायलंड, व्हिएतनाम, हाँगकाँग, सिंगापूर, मिडल ईस्ट आधी भागात पोहचली आहे. नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छिमार बंदरातून 600 कोटींपेक्षा अधिकची निर्यात केली जात आहे. यावर्षी बंदरातून 30 ते 35 मेट्रिक टन मासळीची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे.
ही मासळी अमेरिका, चीन थायलंड तसेच आशिया वन युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघु उद्योगात वाढ झाली आहे. त्यामुळे बंदरातील 450 मासेमारी बोटी, त्यावर आधारित 2 हजार कुटुंबाना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांना लाभ झाला आहे. त्याच बरोबरीने स्थानकांच्याही व्यवसायात भर पडली आहे.
प्रामुख्याने कोळी आगरी बांधवांचीच सर्वाधिक वस्ती आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय करणे ओघाने आलेच. मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांमुळे राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छिमार करंजा गाव म्हणून ओळखले जाते. राज्यातील सर्वाधिक सुमारे 450 मच्छिमार बोटी याच करंजा गावात मासेमारी करतात. राज्यातील सर्वात मोठी मच्छिमार सहकारी संस्थांही करंजातच आहे. वार्षिक सुमारे 100 कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छिमार संस्थेच्या माध्यमातून डिझेल पुरवठा केला जात आहे. मच्छिमारांसाठी लागणारे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी दुकानही सुरू आहेत.
मच्छिमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससून डॉक बंदराच्या आश्रयाला जात होते. त्यामुळे ससून डॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे 300 कोटी खर्चाचे एक हजार मच्छिमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छिमार बंदर उभारण्यात आले आहे. या आधीच मच्छिमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरविण्यासाठी जाळी, रंग, सामान पुरवठा करणारे हार्डवेअर, 20-25 वर्कशॉप्स, जाळींची दुकाने आहेत. करंजा येथून काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छिमार बोटींसाठी लागणारे पंखे, टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे, असे यांत्रिक साहित्य विदेशात पाठवले जाते. 1 जून पासून मासेमारी हंगाम दोन महिन्यांसाठी बंद होणार असून, सद्या 90 टक्के मासेमारी बोटींनी करंजा बंदरात नांगर टाकला असल्याची माहीती करंजा संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली आहे.
करंजा मच्छिमार बंदरावर 2025 च्या मासळी हंगामात 30 ते 35 मेट्रिक टन मासळी उतरविण्यात आली असून, ही राज्यात उतरवण्यात आलेल्या एकूण मासळीच्या 10 टक्के आहे. तर करंजा बंदरातून होणाऱ्या निर्यातीत ही वाढ झाली आहे.
गणेश नाखवा
करंजा निर्यातदार
