करोडोंची विक्रीची रक्कम थकली; वसुलीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल
| उरण | प्रतिनिधी |
मुंबई येथील ससून डॉकला पर्याय म्हणून उरण तालुक्यातील करंजा बंदर निर्माण झाल्याने येथील मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. मात्र, मासळी विक्रीच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा थकीत असल्याने करंजा बंदरातील मच्छिमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामध्ये सुमारे 15 कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मच्छिमार व्यवसाय कसा करावा, असाही प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. यापैकी काही मच्छिमारांनी उरण पोलीस ठाण्यात मासळी खरेदीदारांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
करंजा बंदरातच येथील मच्छिमारांच्या मासळीची विक्री होत आहे. त्यामुळे दर आणि वजन यात मुंबईपेक्षा फरक पडत आहे. याचा फायदा मच्छिमारांना होत आहे. मासेमारी करून आलेल्या बोटीतील टनावारी मासळीची खरेदी-विक्री हा खरेदीदारांच्या आणि विक्री करणाऱ्या मच्छिमारांच्या मधला विश्वासाचा नियमितचा व्यवहार आहे. या विश्वासावर कोट्यवधी रुपयांच्या मासळीची विक्री होत आहे, असा व्यवहार मागील अनेक वर्षे सातत्याने सुरु आहे.
मात्र, करंजा बंदरातून थेट मासळीचा व्यवहार सुरु झाल्यानंतर खरेदीदारांकडून मोठमोठ्या रकमा थकविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील मासेमारी करण्यासाठी लागणाऱ्या रकमा मच्छिमारांकडे उपलब्ध नाहीत. परिणामी, अनेक मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अवघ्या 12 दिवसांनंतर दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीचा कालावधी सुरु होणार आहे. मासळीच्या वजनात घट होत नाही. त्यामुळे मापात पाप होत नाही. तर दरही उत्तम मिळत आहे. मात्र, अनेकांच्या थकीत रकमा वाढल्या आहेत, असे मत करंजा मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केले आहे.
करंजा येथील मासळी विक्रीच्या रकमा न मिळाल्याने दोन कोटींच्या आसपास रकमा न मिळाल्याच्या तक्रारी उरण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहेत.
जितेंद्र मिसाळ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण