रेवदंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी |
भारत-पाकमधील तणावाच्या स्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यात दि. 17 मे ते 3 जूनपर्यंत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, सदर मनाई आदेशाचे उल्लंघन करुन रेवदंडा साळाव पूल व परिसरात प्री-वेंडिंगच्या निमित्ताने ड्रोनने चित्रीकरण करण्यात येत होते. याप्रकरणी चित्रीकरण करणाऱ्यांच्या विरोधात रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेवदंडा हा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसर असून, येथील समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा व परिसर सर्वांनाच भुरळ घालत असतो. त्यामुळे प्री-वेंडिंग शूटिंगसाठी फोटोग्राफर्सना खास आकर्षण या परिसराचे आहे. मात्र, सध्या भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती व रायगड जिल्हाधिकारी यांचे मनाई हुकूम असल्याने प्री-वेंडिंगसाठी या परिसरात ड्रोन चित्रीकरणास बंदी आहे. याबाबत अनेकदा अतिउत्साही तरूण व तरूणी ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना दिसून येतात. अखेर रेवदंडा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीकांत किरविले यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
साळाव पुलावर दि. 17 मे रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास कुलदीप गजेंद्र उपाध्याय, वय 25 वर्षे, रा.पुष्कराज अपार्टमेंट, गांधी चौक, बदलापूर, जि. ठाणे यांनी लग्नाचे शूटिंग करण्याच्या उद्देशाने साळाव पुलापासून समुद्रकिनारा परिसरात ड्रोन विनापरवाना उडवून, जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जितेंद्र मगर यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद नोंदविली. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सद्यःस्थितीमध्ये सागरी किनारा भाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून, कोणी ड्रोनचा वापर करताना आढळून आल्यास, कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीकांत किरविले यांनी दिला आहे.