दरडीचा धोका असूनही उपाययोजना नाही; तहसील, प्रांत यांच्याकडे वर्षभर पाठपुरावा
| नेरळ | प्रतिनिधी |
19 जुलै 2023 मध्ये इरसालवाडीवर दरड कोसळली आणि त्यानंतर प्रशासन निद्र झोपेतून उठले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीमधील 80 घरांचे स्थलांतरण करण्यात आले. पावसाचा जोर कमी झाल्यावर आदिवासी लोक आपल्या घरी परतले. पण, त्यांच्या डोक्यावर दरड असलेली भीती शासनाची आपत्कालीन यंत्रणा अनेक महिन्यात आदिवासी लोकांचे मनातून घालवू शकले नाहीत. पावसाळा संपल्यानंतर या वाडीमधील आदिवासी ग्रामस्थ कर्जत तहसील कार्यालय आणि प्रांत अधिकारी कार्यालय यांच्याकडे दरडी हटवण्यात याव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत.दरम्यान, शासकीय यंत्रणा झोपलेल्या अवस्थेत असून, शासन दरडी कोसळल्यानंतर आमच्या वाडीचे स्थलांतरण करणार काय? असा सवाल आदिवासी ग्रामस्थ करीत आहेत.
खालापूर तालुक्यात इरसालगाद येथे 2023 मध्ये दुर्घटना घडली आणि त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु असल्याने अखेर कर्जत तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे स्थलांतरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यात कर्जत-खोपोली रस्त्यावरील पळसदरी ग्रामपंचायतीमधील पळसदरी ठाकूरवाडीमधील ग्रामस्थांचे स्थलांतरण प्रशासनाने केले. या वाडीमधील 80 कुटुंबांतील लोकांना पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आठ दिवस ठेवण्यात आले होते. त्यानंतर या वाडीमधील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आपली वाडीच्या मागे आलेले मोठ मोठे दगड हलविण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, कर्जत तहसील कार्यालयाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर पळसदरी ग्रामपंचायतचे माध्यमातून मार्च 2024 रोजी या ठाकूरवाडीचे मागे असलेल्या दगडांबद्दल कळविण्यात आले.
प्रशासनाकडून इरसाळवाडी येथील घटना जिवंत असताना, पळसदरी ठाकूरवाडीचे मागे कधीही कोसळतील असे दगड असताना ते काढण्यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासन सहकार्य करीत नसल्याचे ग्रामस्थ गवरनाथ वाघे यांचे म्हणणे आहे.आमच्या वाडीवर पावसाळ्यात दरड कोसळल्याची वाट प्रशासन पाहात आहेत काय? असा सवाल गवरनाथ वाघे यांनी केला आहे.
…तर प्रशासन जबाबदार
या वाडीमधील आदिवासी लोकांनी कर्जत तहसीलदार यांना निवेदन देऊन अनेक महिने उलटले तरी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. उमेश पिरकडं, दिगंबर होला, मारुती वाघ, वसंत होला, ज्ञानेश्वर उघडा आदी अनेक ग्रामस्थांनी शासनाला याप्रकरणी खडेबोल सुनावले असून, आमच्या वाडीवर आपत्ती आल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.
इरसाळवाडी येथील दुर्घटना घडल्यानंतर आम्ही ग्रामस्थ स्वामी समर्थ मठामध्ये राहिलो. प्रशासनाला आमच्या जीवाची एवढी काळजी आहे तर आमच्या वाडीच्या मागे आलेले दगड बाजूला करण्याचे काम का करीत नाही. ते दगड आमच्या वाडीवर कोसळावे याची वाट प्रशासन बघत आहे काय?
गवरनाथ वाघे,
पळसदरी ठाकरवाडी ग्रामस्थ