कोलाड-रोहा रस्त्यावर चोरीच्या प्रमाणात वाढ

पथदिव्यांची मार्किंग करूनही अद्याप अंधारात

। कोलाड । वार्ताहर ।

कोलाड-रोहा राष्ट्रीय मार्गाच्या दोन्ही बाजूंनी तीन महिन्यांपूर्वी पथदिवे बसविण्यासाठी मार्किंग करण्यात आली आहे. परंतु, अद्याप ही या मार्किंगला पोल बसाविण्यात आलेले नाहीत. परिणामी या मार्गावर अंधार असल्यामुळे चोरीचे प्रकार तसेच अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे.

कोलाड-रोहा मार्गावर धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. रात्रपाळीसाठी जाणार्‍या कामगारांची तसेच दुचाकीवरून येणार्‍या जणार्‍यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. तसेच, या मार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठंमोठी झाडे आहेत. शिवाय या मार्गावर जागोजागी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. परंतु, या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे येणारी जाणारी वाहने दिसत नसल्यामुळे अनेक वेळा या मार्गांवर अपघात होत आहेत.

तसेच या मार्गावर पथदिवे नसल्यामुळे दररोज चोरीचे प्रकार वाढले आहे. एक महिन्यांपूर्वी मिथुन जैन यांची 13 हजार रुपयांची सायकल, तर पाच दिवसांपूर्वी आंबेवाडी येथील रामदास लोखंडे यांच्या पान टपरीतुन रोख रक्कम व माल चोरीला गेला आहे. तसेच, पालेखुर्द येथील टपरी फोडून माल चोरीला गेला आहे. या मार्गावर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरी होत असुन लवकरच लवकर या मार्गांवर पथदिवे बसविण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

अनेक ठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी खड्डे खोदून विद्युत पोल उभे करण्यासाठी सिमेंटची मार्किंग करून ठेवली आहे. परंतु, अद्याप पथदिवे बसविण्याचे काम सुरु झाले नाही. यामुळे अंधाराचा फायदा घेत या परिसरात चोरीचे प्रकार घडत आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे थांबण्यासाठी येत्या गणेश उत्सवापूर्वी या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावे.

रामदास लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version