| अलिबाग | प्रतिनिधी |
समुद्रातील ताज्या मासळीला सध्या प्रचंड मागणी असली तरी बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. पहाटे गारठा आणि दुपारनंतर झपाट्याने वाढणारे तापमान असे विचित्र वातावरण सध्या अनुभवास येत असून, या चढउतारामुळे समुद्रातील मासळीची ठिकाणे शोधणे मच्छीमारांसाठी कठीण झाले आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासळी न मिळाल्याने खाली हात परतावे लागत आहे. मासे शोधण्यासाठी वापरले जाणारे ‘फिश फाइंडर’ किंवा ‘इको साउंडर’सारखी सोनार तंत्रज्ञानावर आधारित उपकरणेही अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे मच्छीमार सांगतात. तापमानातील अचानक बदलामुळे मासे आपली ठिकाणे बदलत असल्याने रडारवर अचूक नोंद मिळत नाही, याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. ताज्या मासळीचे दर सध्या तिप्पट वाढले असून सुरमय, पापलेट, कोळंबी यांसारखी लोकप्रिय मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. काही दिवसांपूर्वी चार पापलेट साधारण 400 रुपयांना मिळत असत; मात्र त्याच आकाराचे पापलेट सध्या 1,200 रुपयांपर्यंत विकले जात आहेत.
ताज्या मासळीच्या दरात वाढ
