वाढवू भाषेचा गौरव

डॉ. निशिगंधा वाड

पेन्सिलला टोक केल्यानं ती अधिक ठळक आणि स्पष्ट लिहिते हे सत्य सगळ्यांनाच ठाऊक आहे. याच धर्तीवर बोलायचं तर विचार करतो तेव्हा मेंदू अधिक अचूकपणे काम करु लागतो. मराठी भाषेतल्या साहित्याच्या प्रत्येक अंगांमध्ये मेंदूला विचार करण्यास भाग पाडण्याची ताकद आहे. म्हणूनच एकत्र येऊन मराठी भाषा दिन आनंदानं साजरा करणं आणि तिचा गौरव अनंत काळ टिकेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. 

मराठी राजभाषा दिन साजरा करताना प्रत्येक मराठी मनात भाषेप्रतीचं प्रेम, अभिमान उचंबळून येणं स्वाभाविक आहे. यंदा आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार चळवळ सुरू असून गेल्या अनेक वर्षांची मराठीजनांची ही मागणी आता पूर्ण व्हायलाच हवी. या चळवळीत अनेकांचा वाटा आहे. त्यात माझ्या आईचा, साहित्यिक विजया वाड यांचाही खारीचा वाटा आहे. विश्‍वकोशाची अध्यक्ष असल्यापासूनच आईने ही मागणी लावून धरली. मी त्याची साक्षीदार आहे. पंधरा लाख लोकांपर्यंत आणि 105 देशांपर्यंत पोहोचला तेव्हा विश्‍वकोश ई-बुकमध्ये करण्याचा संकल्प सुफळ झाला. आत्तापर्यंत मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधानांकडे लाखो पत्रं गेली आहेत. एकीकडे हे काम सुरू असताना या भाषा दिनी ट्रस्टच्या माध्यमातून आपण अडीच हजार गरीब मुलांना मराठी पुस्तकं वाटत आहोत. आपण शंभर लेखकांची पुस्तकं काढली आणि ती मोफत वाटली याचं कारणच असं की भाषेची गोडी वाढली पाहिजे आणि ती अभिरुचीसंपन्न झाली पाहिजे. आपल्याकडे सकस साहित्य उपलब्ध आहे. पण त्याची गोडीच वाटली नाही, वाचायची सवयच राहिली नाही तर कशाचाच उपयोग नाही.
आजच्या डिजिटल युगामध्ये हातातल्या स्मार्टफोनमध्ये सगळं विश्‍वकेंद्रित झालं आहे. त्यात साहित्यही नव्या रुपात सामावलेलं आहे. पण ते उघडून वाचण्यासाठी मनात उत्सुकता निर्माण होणं गरजेचं आहे. अर्थातच त्यासाठी याप्रती जागृती निर्माण करावी लागणार आणि त्यासाठी अर्थसाह्य लागणार. त्यासाठीच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर केंद्राकडून ती सवलत मिळेल. आज देशात साधारणत: 450 विद्यापीठं आणि 1200 ग्रंथालयं आहेत. या सगळ्यांमध्ये मराठी साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करुन, साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून समोर आणणं, त्याची माहिती देणं यासाठी अर्थसाह्याची नितांत आवश्यकता आहे. एखादी गोष्ट केवळ बोलली गेली तर वार्‍यावर विरुन जाते. म्हणूनच लोकगंगेपर्यंत पोहोचायचं झालं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं गरजेचं आहे. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्‍वरी बाराव्या-तेराव्या शतकातली आहे. त्यापूर्वीही हीच भाषा महारट्टी, मर्‍हाटी, मराहट्टी, महाराष्ट्री आदी नावानं वापरात होती. म्हणजेच ती अत्यंत प्राचीन आहे. यासंबंधीचे अनेक पुरावे आपण दिले आहेत. त्यामुळेच आता आपल्या भाषेला हा गौरव प्राप्त होणं गरजेचं आहे.
आपल्याकडे सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आदी भाषा अभिजात म्हणून मान्य झालेल्या आहेत. बावीस भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिला गेला आहे. एकीकडे असं असताना मराठी ही भाषा या क्रमवारीत आठव्या स्थानावर येण्याच्या योग्यतेची आहे असं संशोधक आणि अभ्यासकांचं मत आहे. काही संशोधक मराठीला दहा ते पंधराच्या दरम्यानचं स्थान देतात. आज जगभरात जवळपास 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. असं असेल तर आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळणं गरजेचं आहे. खरं पाहता इतकं उत्खनन करुन भाषा दीड हजार वर्षांपूर्वीची की अडीच हजार वर्षांपूर्वीची, या वादात पडण्यापेक्षा ती पुढची अडीच हजार वर्षं कशी टिकेल याचा विचार करणं मला अधिक गरजेचं वाटतं. त्यासाठीच प्रत्येक मराठी माणसाने या भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा आग्रह धरायला हवा.
मुलांना आपल्या भाषेची गोडी वाटली पाहिजे. आपण आईच्या दुधाची गोडी विसरतो. शास्त्रानं सिद्ध करुन दाखवलं आहे की मुलींची स्मरणशक्ती तीन वर्षं तीन महिने तर मुलांची स्मरणशक्ती तीन वर्षं पाच महिन्यांनंतर आकाराला येते. त्याआधीचा काळ आपल्याला आठवत नाही. त्यामुळेच आईच्या दुधाची गोडी कोणालाच स्मरतही नाही. पण आपण मातृभाषेची गोडी अशीच विसरुन गेलो तर कालांतराने आई-वडिलांचं, देशाचं प्रेमही आपण विसरुन जाऊ. खरं तर आपल्या संस्कृतीची पाळमुळं घट्ट रुजवण्यासाठी या गोष्टी मूलभूत आहेत. ती जगण्याची अविभाज्य अंगं आहेत. एखादी व्यक्ती ठराविक पद्धतीनं विचार का करते यामागे काही मूळं असतात आणि त्या मुळांवर त्या व्यक्तीच्या मानसिक जडणघडणीचा पगडा असतो. या सगळ्याच्या कक्षा तुमच्या भाषेच्या साहित्यिक मूल्यांवर अवलंबून असतात. घरोघरीचं वातावरण भाषेच्या आधारे घडत असतं आणि ते घडण्यामध्ये वाचनाचं मोलाचं योगदान असतं.
आपल्याकडे विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्याचा दर्जा डोळे दिपवून टाकणारा आहे. ते जगासमोर आलं तर माणसं हरखून जातील यात शंका नाही. मी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ नावाचा एक कार्यक्रम करते. हा एक दर्जेदार कार्यक्रम आहे. याचा नामोल्लेख करते कारण यात सहभाग घेणारी माणसं खरंच आपल्या देशाचं भूषण आहेत. डॉ. नारळीकर सर, काकोडकर सर, डॉ. माशेलकर सर, मेधा पाटकर, उज्ज्वल निकम, विजय कुवळेकर अशी किती नावं घेऊ… वेगवेगळ्या प्रांतातली ही दिग्गज माणसं आज आपल्यामध्ये आहेत, ती कार्यरत आहेत. आजपासून तीस वर्षांनंतर आपण पुढच्या पिढीचा विचार करतो तेव्हा त्यांना या माणसांच्या योगदानाची माहिती असणं गरजेचं नाही का? यासाठीच समृद्ध माणसांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं काम, आपल्या भाषेमध्ये केलेली साहित्यनिर्मिती आणि या भाषेत मांडलेले मोलाचे विचार जनसामान्यांपर्यंत, विशेषत: पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. यासाठीच राजभाषा दिनाला यथोचित स्थान आणि प्रसिद्धी मिळाली पाहिजे.
भाषा आपल्याला समृद्ध तसंच संस्कारित करते. मी स्वत: बाळ पोटात असताना ज्ञानेश्‍वरीचं पठण केलं. पोटातल्या जीवावर गर्भसंस्कार व्हावेत, हा त्यामागचा हेतू होता. त्याआधी मी ज्ञानेश्‍वरी हातात धरली नव्हती. मला संस्कृत शिकवलं गेलं हा भाग्याचा भाग होता. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या 450 विज्ञापीठांमध्ये ही भाषा शिकण्याची आणि शिकवण्याची कुवत निर्माण होईल. 1200 ग्रंथालयांमध्ये ई-बुक्स स्वरुपात अनेक ग्रंथ उपलब्ध होतीत. नवीन पिढीला आवडेल अशा पद्धतीनं ते त्यांचा आस्वाद घेऊ शकतील. हव्या त्या मार्गाने ते या भाषेपर्यंत पोहोचू शकतील. या सगळ्या गोष्टींसाठीच आपल्या भाषेच्या अभिजात दर्जासाठी प्रत्येकाने आग्रही राहणं गरजेचं आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे मराठी साहित्य विपुल आहे. लेखक अतिशय चांगलं लिहित आहेत. चित्रसृष्टीबद्दल बोलायचं झालं तर दर्जेदार चित्रपट तयार होतात कारण त्याला तशा दर्जेदार कथांचा पाया असतो. म्हणूनच मराठीतली अशी समृद्ध साहित्यनिर्मिती अधिक ठोसपणे पुढे आणणं ही आपली जबाबदारी आहे. यासाठी मराठी लिहिण्याची आणि वाचण्याची सक्ती करण्याची वेळ आली तरी हरकत नाही, असं माझं मत आहे. नवीन पिढीवर चांगल्या गोष्टी लादल्यानं त्यांचं काहीही नुकसान होत नाही. मराठी ही राज्यभाषा आहे, अभिजात भाषा आहे आणि ती तुम्ही शिकायची आहे, त्या भाषेतलं साहित्य वाचायचं आहे असा आग्रह धरणंही चुकीचं नाही. शेवटी काही वेळा औषध देतातच. कधी ते आजार दूर करतं तर कधी ते टॉनिक म्हणूनही काम करतं. म्हणूनच ते गरजेचं असतं आणि कालांतराने त्याचा उपयोग अथवा परिणाम समोर येत असतो. काळ उलटला की देहाला आणि बुद्धिला त्याचं महत्त्व कळतं. आज सौदीमध्ये वर्गांमध्ये महाभारत आणि रामायण शिकवलं जातं. याची नक्कीच लाज बाळगायला हवी की ते आपल्याकडे शिकवलं जात नाही.
या शिकवण्यामागे विचार करण्याची पद्धत रुजवणं, ते विचार रुजवणं हे मूळ कारण असतं. जपानमध्ये अ‍ॅबॅकस शिकवलं जातं. या पद्धतीत दशलक्षांचे हिशेब बोटांवर करण्याइतकी ताकद आहे. म्हणजेच मुलांची बुद्धी निखरावी म्हणून आपल्याकडची ही समृद्धी बाकीचे देश वापरुन घेत आहेत. पेन्सिलला टोक केल्यानं ती अधिक ठळक आणि स्पष्ट लिहिते हे सत्य सगळ्यांनाच ठाऊक आहे. याच धर्तीवर बोलायचं तर विचार करतो तेव्हा मेंदू अधिक अचूकपणे काम करु लागतो.
मराठी भाषेतल्या साहित्याच्या प्रत्येक अंगांमध्ये ही ताकद आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषा दिन आनंदाने साजरा करु आणि तिचा गौरव अनंत काळ टिकेल अशी आशा व्यक्त करु.

(शब्दांकन: स्वाती पेशवे)

Exit mobile version