। नेरळ । प्रतिनिधी ।
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र माध्यमातून साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणाला पेण बँकेमुळे आर्थिक संकटात आलेल्या खातेदार आणि ठेवीदारांनी गर्दी केली आहे. दरम्यान, साखळी उपोषणाच्या दुसर्या दिवशी कर्जत जेष्ठ नागरिक संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
2010 पासून बंद असलेल्या पेण बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही. आणि त्यांनी गुंतवलेले तसेच त्यांच्या ठेवी अद्याप मिळाल्या नाहीत. खातेदार आणि ठेवीदार यांना न्याय मिळावा यासाठी पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणामध्ये पेण बँक संघर्ष समितीचे प्रदीप सुर्वे, दीनानाथ देशमुख, चिंतामणी पाटील, सुरेखा गांधी, प्रदीप शहा, अनिल बोभाटे, रवींद्र दरने, धनंजय देशमुख, प्रदीप कदम, सुनील नांदे, भरत करमरकर, समीर सराफ, रिधी पुराणिक, सीमा मिरकुदे, गणेश काळे, मेघा राणे, अस्मिता सावंत, सुलभा लोंढे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.