| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा एमआयडीसी परिसरातील लाडीवली गावाशेजारी सन 1962 पासून सुरू असलेल्या लोना इंडस्ट्रीज लिमिटेड, लाडीवली मधील सुमारे 15 ते वीस वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करीत असणार्या 53 कंत्राटी कामगारांना लोना कंपनीत कायम करण्यासह पगार वाढ व इतर अनुषंगिक मागण्यांसाठी 17 फेब्रुवारीपासून लोना इंडस्ट्रीजच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोना इंडस्ट्रीजमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणारे कामगार अनजवळजवळ 20 वर्षापासून प्रोडक्शन विभागात काम करणार्या एकूण कामगारांपैकी 1 मे 2022 पासून 10 कामगारांना कंपनीच्या पे रोलवर कामावर घेण्यात आले. यावेळी टप्प्याटप्प्याने इतर सर्व कामगारांना परमनंट करण्याचेही ठरले होते. परंतु, लोना इंडस्ट्रीज लि. च्या व्यवस्थापनाने तसे केले नाही, ठरल्याप्रमाणे जर कंपनीने प्रतीवर्ष पुढील 10 कामगारांनाही पे रोलवर परमनंट केले असते, तर इतर कंत्राटी कामगारांवर अन्याय झाला नसता. कंत्राटी कामगार मागील 20 वर्षापासून लोना इंडस्ट्रीज लिमिटेडच्या उत्पादन निर्मितीमध्ये काम करीत असताना लोना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापन जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांवर अन्याय करीत असल्याने कामगार संघटनेने प्रतिनिधी व कामगारांनी लोना इंडस्ट्रीज लि.चे पर्सनल मॅनेजर व कामगार आयुक्तांना पत्रव्यवहार करून कामगारांच्या समस्यांबाबत कळविले. तद्नंतर लोना इंडस्ट्रीज लि.चे मॅनेजर, कामगार नेते आणि कंत्राटी कामगार प्रतिनिधींसोबत चार बैठका होऊनही कोणताही ठोस निर्णय निघत नसल्यामुळे अन्यायग्रस्त कंत्राटी कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी कंपनीच्या पे रोलवर कायम करून घ्यावे, पगारवाढ द्यावी व इतर मागण्यांसाठी कामगार आपल्या कुटुंबियांसह लोना इंडस्ट्रीजच्या गेटसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.