न्यायासाठी दिव्यांगांचे बेमुदत उपोषण

जागेची कर आकारणी करण्याची मागणी

। रायगड । प्रतिनिधी ।

गुळसुंदे येथील दिव्यांग असणाऱ्या म्हामणकर कुटुंबातील दोघांनी ग्रामपंचायतीच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जागेची कर आकारणी करण्याचे पनवेल पंचायत समितीचे आदेश असतानादेखील गुळसुंदे ग्रामपंचायत पदाधिकारी विलंब करीत असल्याने व्यथित होऊन उपोषण सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणे असल्याचा निर्धार म्हामणकर कुटुंबीयांनी केला आहे.

गुळसुंदे येथील  गायत्री म्हामणकर व गणेश  म्हामणकर हे दोघेही डोळयांनी १०० टक्के अंध-अपंग आहेत.  त्यांनी त्यांच्या जागेवर कर आकारणी करण्यासाठी ग्रामपंच्यात गुळसुंदे येथे अर्ज दाखल केला होता. हा अर्ज स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत गुळसुंदे, पंचायत समिती पनवेल, तहसीलदार पनवेल आणि अपंग आयुक्तालय, पुणे यांचेकडे पाठविला होता. आठ महिन्यानंतर अर्जावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने जागेची कर आकारणी करण्याचा  पुन्हा अर्ज सादर केला असे म्हामणकर कुटुंबीयांनी सांगितले.

१०० टक्के अंध-दिव्यांग असतानाही शासन दरबारी न्याय मिळत नाही. त्यामुळे अत्यंत व्यथित होऊन म्हामणकर कुटुंबीयांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला. दिव्यांग म्हामणकर कुटुंबीयांनी समस्येवर योग्य ती चौकशी करून  जागेची कर आकारणी त्यांच्या नावाने कार्यवाही करण्यासाठी  सादर केलेलं प्रकरण  रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पनवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला. गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशीसाठी  ग्रामपंचायत गुळसुंदे यांचेकडे देण्यात आला.

गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी कर आकारणी करण्याचे कबूल केले व तशा प्रकारचा आदेश ग्रामपंचायत गुळसुंदे यांना देण्यात आला . त्यानुसार ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी कर  आकारणी करण्याचा ठराव करण्यात आला. असे असूनही अद्यापपर्यत म्हामणकर कुटुंबियांच्या नावाने कर आकारणी झाली नाही. यामुळे हवालदिल झालेल्या दिव्यांग म्हामणकर कुटुंबीयांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Exit mobile version