ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवारी (दि.15) रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी शाळांपासून, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच, जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबागमधील पोलीस मुख्यालयात झाला. यावेळी रोजगार मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अध्यक्ष मंगेश वाकडीकर याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तर पंचायत समिती, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा कारागृह, जिल्हा न्यायालय, उपविभागीय व तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषद शाळांसह माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी काही शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, विद्यार्थ्यांचा सन्मान, स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच, वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक संघटनेच्यावतीने ऑर्केस्ट्राचे आयोजन केले. यावेळी देशभक्तीपर गीतांसह नृत्यांचे सादरीकरणाचा आनंद नागरिकांनी मनमुरादपणे घेतला. सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी पावसाने हजेरी लावली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत अनेकांनी पावसात भिजत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी एक वेगळा उत्साह दिसून आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग पोलीस परेड मैदानावर पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले.

नेरळमध्ये मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास प्रचंड गर्दी

हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने 22व्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मध्यरात्री ध्वजारोहण कार्यक्रमा आयोजित केला होता. यावेळी देशप्रेमी तरुणांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यावेळी झेंडा फडकवण्याच्या आधी मशाल फेरी काढण्यात आली. हुतात्मा चौक येथून निघालेली मशाल फेरी नेरळ गावातून पुन्हा हुतात्मा चौकात आली. त्यानंतर 12 वाजून 3 मिनिटांनी अग्निवीर सिद्धी क्षीरसागा यांचे हस्ते राष्ट्रीय झेंडा फडकावून स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजास सलामी

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा शनिवारी छत्रपती संभाजी महाराज मैदानावर उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सलामी दिली.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गर्जनेने श्रीवर्धन दुमदुमले

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान श्रीवर्धन (रायगड) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य श्री भगवा ध्वज व तिरंगा ध्वज प्रभात फेरी अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाली. शनिवार (दि.15) ऑगस्ट रोजश्री गणेश मंदिर येथून या भव्य प्रभात फेरीचा प्रारंभ झाला. सर्व धारकरी आणि नागरिक पारंपरिक वेषात, डोक्यावर वारकरी टोपी परिधान करून या फेरीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

शिळफाटा येथील सह्याद्री विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.






