। मुंबई । प्रतिनिधी ।
इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींच बहुमत संपवले, असे विधान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केले आहे. तसेच, आघाडीत संवादाची गरज असल्याचे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आमचे काही घटक पक्ष हे या भुमिकेत आहेत की संवाद तुटला आहे. हा संवाद जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद संपल्याने युती तुटली होती. 2019 साली योग्य प्रकारे संवाद झाला नाही त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला. इंडिया आघाडीत 30 पक्ष आहेत, या 30 पक्षांसोबत संवाद ठेवण्यासाठी जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सतत सांगितले आहे. इतर प्रमुख नेत्यांनीही हा विषय मांडला आहे. परंतु, एक मात्र सत्य आहे, जे ओमर अब्दुल्लाह आणि इतर नेत्यांनी सांगितले की ही आघाडी लोकसभा निवडणुकासाठी निर्माण झाली होती. हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणात इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली आहे. नरेंद्र मोदींचे बहुमत संपवून टाकले आहे. म्हणून ही आघाडी टिकायला हवी. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
तसेच, देशापुढे सर्वात मोठे संकट हे मोदी आणि शहा आहेत. त्यांची हुकूमशाही आणि संविधानावर होणारे हल्ले हे मोठे संकट आहे. जर त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचे आहे तर इंडिया आघाडीला आणखी मजबुतीने काम करण्याची गरज आहे, अशी आमची भुमिका असल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.