महिला आशियाई हॉकी स्पर्धेत भारताची सलामी थायलंड विरुद्ध

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

झारखंड येथे होणार्‍या आशियाई महिला अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचे वेळापत्रक आशियाई हॉकी फेडरेशन आणि हॉकी इंडिया यांनी जाहीर केले. मलेशिया आणि जपान यांच्यातील पहिल्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील (27 ऑक्टोबर) तिसरा सामना यजमान भारत आणि थायलंड यांच्यात मरांग गोमके जयपाल सिंह हॉकी स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत कोरिया, मलेशिया, थायलंड, जपान, चीन आणि भारत हे सहा संघ एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल.

गटसाखळीत सर्व संघ एकमेकांशी खेळणार असून अव्वल चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत. गुणतालिकेत प्रथम क्रमांकावरील संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होईल, तर दुसर्‍या क्रमांकावरील संघाचा सामना तिसर्‍या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. या स्पर्धेतील सहा हंगामांपैकी 2010, 2011 व 2016 असे तीनदा विजेतेपद मिळवणार्‍या कोरियाचे संघाचे गतविजेत्या जपानसमोर कडवे आव्हान असणार आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक ब्राँझपदक आणि एफआयएच महिला हॉकी नेशन्स करंडक स्पेन 2022 स्पर्धेत जेतेपद पटकाविल्यानंतर आता यजमान भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आशियाई आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेचा 2016 चा हंगामही जिंकला होता.

Exit mobile version